#SataraFlood पूरस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत पाहूण्यांकडे थांबणार

#SataraFlood पूरस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत पाहूण्यांकडे थांबणार

कलेढोण : गेले काही दिवस धुवांधार पाऊस होत आहे, कृष्णा नदीनेही चोहोबाजूला पाण्याचा वेढा दिला आहे. दिवसेंदिवस महापूराचा प्रलय वाढत आहे. वीज पुरवठा बंद आहे तर पिण्याचे पाणी देखील नाही. घरातील अन्न धान्यावर आत्तापर्यंत गुजराण केली. प्रशासनाने पूर परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढले आता पूराचे पाणी कमी होऊन परिस्थिती पूर्वपदावर येई पर्यंत पै - पाहुणे, नातेवाईकांकडे थांबणार आहोत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध गावांतील हे पूरग्रस्त व्यथा मांडत होते. पूरस्थितीमुळे अनेक जण खटाव, माण तालुक्यांतील नातलगांकडे आले आहेत. त्यांच्या बोलण्यातून पूराची भिषणता लक्षात येत होती.
गेल्या काही दिवसांत होत असलेल्या मुसळधार पावसाने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत हाहाकार माजवला आहे. कृष्णा, पंचगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून गावेच्या गावे कवेत घेतली आहेत. अनेक गावांना भयाण पाण्याचाच वेढा पडला आहे. प्रशासनाने देखील शर्थीचे प्रयत्न सुरू करून पूरग्रस्तांसाठी मदत व उपाय योजना राबविल्या आहेत. यातील बहुतांशी पूरग्रस्तांनी आपापल्या नातलगांकडे धाव घेतली आहे. या पूरग्रस्तांतील हाजी सिकंदरभाई तांबोळी (रा. भिलवडी, जि. सांगली) हे गेल्या तीन ते चार दिवसांपासून त्यांचे मायणी (ता.खटाव) येथील नातलग  व बहार हॉटेलचे मालक मुसाभाई तांबोळी यांच्याकडे आले आहेत. गाव कृष्णाकाठावर आहे. गावाला पूर्ण पाण्याने वेढले आहे. गावात भिषण पूरस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने आम्हाला तेथून वाचविल्याचे त्यांनी सांगितले. सांगलीतील पंचमुखी मारूती मंदिर भागांत राहणारे  दिलीप शितोळे (वय ६१) हे पत्नी सौ. सुनंदा व दोन वर्षांच्या एका लहान नातीसह बिजवडी (ता.माण ) येथील कन्या सौ. धनश्री व दोस्ती फोटोजचे मालक छायाचित्रकार जावई गणेश शिंदे यांच्याकडे आले आहेत. वयोवृद्ध दांपत्याने या लहान नातीसह कन्या व जावयांकडे धाव घेतली आहे. सांगलीतील व्यापारी पेठ, भाजी मंडई, बस स्थानक आदी परिसराला पूराच्या पाण्याने पूर्णत: वेढा दिला आहे. सर्वत्र महापूराचेच रौद्ररूप दिसत आहे. दिवसेंदिवस पूरस्थिती बिकट बनत आहे.  एस.टी.सेवादेखील विस्कळीत झाली आहे त्यामुळे तेथून त्यांनी मिळेल त्या वाहनाने बिजवडीकडे आज धाव घेतली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी कपडे आदी साहित्य दोन बॅगांमध्ये घेऊन घर सोडले. लहान नातीसह मिळेल त्या वाहनाने प्रसंगी उभे राहून प्रवास करीत बिजवडीकडे प्रयाण केल्याचे श्री. शितोळे यांनी सांगितले. 
मायणीतील भारतमाता विद्यालयातील शिक्षक श्री. दत्तात्रय श्रीखंडे यांचे वाळवा (जि. सांगली) येथील सासरे व अन्य आठ ते दहा नातेवाईकही गेल्या तीन चार दिवसांपासून आले आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थिती बिकट होत असल्याने तेथील पूरग्रस्तांनी खटाव, माण तालुक्यातील नातेवाईकांकडे धाव घेतली आहे.

सकाळ बातमीदाराची मदत...
दैनिक सकाळचे खटाव तालुका प्रतिनिधी व वडूज बातमीदार आयाज मुल्ला हे कामानिमित्त मायणीला गेले होते. त्यावेळी मायणीहून वडूजला येत असताना मायणीच्या चांदनी चौकात एक वयोवृद्ध दांपत्य एका लहान बाळासह पावसात उभे राहून वाहने थांबविण्याची विनंती करीत होते. त्यावेळी श्री. मुल्ला यांनी या वयोवृद्धांना पाहून आपली चारचाकी थांबविली. तेव्हा दहिवडीला जायचे असल्याचे त्यांनी सांगितले.  तुम्हाला कातरखटावपर्यंत नेतो असे सांगून मुल्ला यांनी त्या वयोवृद्ध दांपत्याला आपल्या चारचाकीमध्ये घेतले. त्यावेळी संबंधित दांपत्य हे सांगलीतील श्री. शितोळे असून ते पूरग्रस्त परिस्थितीतून आले असून बिजवडी (ता.माण)  येथे कन्या व जावयांकडे निघाले असल्याचे त्यांनी सांगितले. सांगलीतून निघाल्यापासून कोणतीही चारचाकी वाहने थांबेनात काही वाहने थांबली मात्र त्यामध्ये जागा नव्हती त्यामुळे उभे राहून प्रवास केला. मिळेल त्या वाहनाने लेक व जावयांकडे जाण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. अशा परिस्थितीमध्ये दैनिक सकाळचे बातमीदार श्री. मुल्ला यांनी केलेल्या सहकार्य भूमिकेचे व मदतीचे त्यांनी आवर्जून आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com