पुणे-बंगलोर हायवेवर पुराचे पाणी; वाहतूक थांबवली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

शिरोलीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या सेवामार्गावरील वाहतूक बंद केल्याने सांगलीहून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक नागाव फाटामार्गे महामार्गावर वळवली आहे.

शिरोली पुलाची : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता.5) बुधले मंगल कार्यालयाजवळ सायंकाळी पुराचे पाणी आले. त्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक बंद करण्यात आली. बंगळूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर पाणी यायला सुरवात झाली. महामार्गावर सुमारे दीड फूट उंचीचे पाणी आहे. 

दरम्यान, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या परिसराची पाहणी केली. संततधार पावसामुळे दोन्ही सेवा मार्गावरील वाहतूक कालच बंद झाली. 2005 ला जेथून महामार्गावर पाणी आले होते, त्या ठिकाणावरूनच सायंकाळी पाचला पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर पाणी येण्यास सुरवात झाली. सुरवातीला एका बाजूला असणाऱ्या पाण्याने दोन तासांत पूर्ण महामार्ग व्यापला. रात्री आठच्या सुमारास महामार्गावर जवळपास दोन फूट पाणी होते. या पाण्यातूनच पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू होती. पुराचे पाणी, तावडे हॉटेल येथील भुयारी मार्गात साठलेले पाणी आणि बघ्यांच्या गर्दीमुळे वाहतूक वारंवार विस्कळित होत होती. 

शिरोलीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या सेवामार्गावरील वाहतूक बंद केल्याने सांगलीहून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक नागाव फाटामार्गे महामार्गावर वळवली आहे. यामुळे सांगली फाट्यालाही वारंवार वाहतूक विस्कळित होत होती. महामार्गावर एक ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood water on Pune Bangalore Highway Traffic stopped