पूर ओसरल्याने दिलासा; मात्र पिकांच्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

- भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) परिसरात  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- पुर ओसरला जाऊ लागल्याने तूर्तास तरी ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

पटवर्धन कुरोली : भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) परिसरात  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर ओसरला जाऊ लागल्याने तूर्तास तरी ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या पाच दिवसांपासून भीमा नदीत उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. या पाण्यामुळे नदीकाठच्या गावात पुरस्थिती निर्माण झाली होती. या आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण झाले होते. या पाण्यामुळे पटवर्धन कुरोली, पिराची कुरोली, वाडी कुरोली, शेळवे, देवडे, आव्हे, नांदोरे या गावातील अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अनेक घरात पाणी शिरल्याने घरांच्या भिंती खचल्या आहेत. काहीजणांच्या घराचे पत्रे वाहून गेले आहेत.

दोन दिवस पाण्यात असल्याने पटवर्धन कुरोली येथील मारुती मंदिर आणि श्रीनाथ मंदिराचे कट्टे खचले आहेत. त्यामुळे ते कट्टेही पडण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. पटवर्धन कुरोली प्रशालेची संरक्षक भिंतही पडली आहे. याच बरोबर शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. काही शेतातील मोठ्या प्रमाणात  माती वाहून गेली आहे. शेतातील विजेचे खांब पडले आहेत तर पाईप, केबल, स्टाटर पेट्या वाहून गेल्या आहेत. तर अनेक शेतकर्यांची उभी पीके पाण्यात गेली आहेत. यामध्ये उस, मका, भुईमूग, सोयाबीन, मिरची, केळी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

एकीकडे दुष्काळात सांभाळलेली पिके ही पुरामध्ये गेल्याने शेतकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज पाचव्या दिवशी नदीचा पुर हळूहळू ओसरु लागला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Floods ruined the village yet as it slowsdown people get comfort