चाळकेवाडी पठारावरही फुलांचे गालिचे 

चाळकेवाडी पठारावरही फुलांचे गालिचे 

परळी - निसर्गसौंदर्याने नटलेल्या जिल्ह्यात पावसाळ्यात विविधरंगी फुलांचा बहर सुरू झाला आहे. कासपाठोपाठच आता चाळकेवाडीचे पठारही फुलांनी भरून गेले आहे. विविध रंगांच्या फुलांनी चाळकेवाडी पठारावर उधळणच केली आहे. मुळातच तांबड्या मातीमुळे उठून दिसणारे हे पठार आता पिवळा, गुलाबी आणि पांढऱ्या रंगांच्या फुलांनी सजून गेले आहे. 

कास पठार हे जागतिक वारसा यादीत पोचल्यानंतर पर्यटकांचा ओढा कासकडे आहे. पण, सातारा शहराच्या पश्‍चिमेकडे असलेले चाळकेवाडीचे पठारही आता फुलांनी बहरू लागले आहे. ठोसेघर धबधबा, पवनचक्‍क्‍या, सज्जनगड, उरमोडी धरणाचा परिसर आणि फुलांनी आच्छादलेले चाळकेवाडी पठार असा आनंद पर्यटकांना घेता येतो. कास पठारापेक्षा वेगळ्या जातीची आणि वैविध्यपूर्ण फुले येथेही फुलू लागलीत. कास पठारावर गेल्या अनेक वर्षांपासून फुलांचा बहर येत होता. मात्र, त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नव्हते. 

तशीच परिस्थिती चाळकेवाडी पठाराचीही आहे. या पठारावरही विविध जातींची फुले मोठ्या प्रमाणावर फुलतात. परंतु, त्याबाबत अजूनही फारसे कोणाचे लक्ष गेलेले नाही. त्यामुळे हा परिसर कोलाहलापासून दूर आहे. तरीही अनेक पर्यटक त्याचा आनंद घेतात. निळ्या, पिवळ्या, गुलाबी, लाल आणि पांढऱ्या रंगांच्या फुलांचा हा गालिचा काश्‍मीरमधील फुलांच्या गालिचाची आठवण करून देतो. कधी धुके, कधी ऊन, तर कधी धुवांधार पावसामुळे चाळकेवाडी पठारावर ऊन, पावसाचा पाठशिवणीचा खेळच सुरू असतो. चाळकेवाडीच्या पठारावर सध्या सोनकी, एक ढांगी, निळवंत, लाल गोधणी, करडू, सोनटिकली अशा अनेक प्रकारच्या फुलांच्या जाती पाहायला मिळतात. निसर्गरमस्य ठोसेघर धबधबा, पवनचक्‍क्‍यांचे विस्तीर्ण पठार, खळखळून वाहणारे झरे, दाट धुके, तारळी धरणाच्या पाण्याचा फुगवटा, कोयना जलाशयाचा काही भाग, विविध प्रकारचे पक्षी याठिकाणी पाहायला मिळतात. 

पर्यटकांना चांगल्या सुविधांची गरज 
सध्या चाळकेवाडी पठारावरील फुललेल्या फुलांसह परिसरातील निसर्गाचा आनंद पर्यटक घेताना दिसतात. कास पठाराप्रमाणेच या ठिकाणी देखील पर्यटनाला अधिक वाव आहे. त्यादृष्टीने वन विभाग आणि स्थानिक नागरिकांनी चांगली व्यवस्था केली तर या भागातील पर्यटनही खूप चांगल्या पद्धतीने बहरेल, यात शंका नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com