बाजारपेठ बंद असल्याने ऐन हंगामात झेंडू वाया... 

flower market down because of corona effect
flower market down because of corona effect

दानोळी (कोल्हापूर) - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऐन पाडवा व लग्न हंगामात देशातील संपूर्ण बाजारपेठच बंद असल्याने फुल उत्पादक शेतक-यांचा हा हंगाम वाया गेला आहे. गेल्या सात महिन्यात दरवर्षी सरासरी मिळणा-या दरापेक्षा निम्याने दर मिळत होता. पाडव्याला व लग्नाच्या हंगामात दराची लॉटरी लागेल या अपेक्षाने शेतक-यांनी झेंडू व शेवंती फुलाची लागवड केली आहे. मात्र हंगाम वाया जातो की काय असा प्रश्न पडला आहे. सध्या शेतकरी झाडाला इजा पोहचू नये म्हणून उमललेली फुले तोडून टाकत आहेत. आठ दिवसापूर्वी मिळणारा जेमतेम दर आणि आता बाजारपेठच बंद त्यामुळे शेकडो फूल उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. 

फुलांना गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, लग्न हंगाम यावेळी मागणी व दर असतो. प्रत्येकवर्षी या हंगामात सरासरी झेंडू फुलांना किलोला 50 ते 80 रुपये तर शेवंती फुलांना 150 रुपये दर असतो. गेल्या सात महिन्यात गणेशोत्सव व दिवाळी सणात 4 दिवस 40 रुपये दर होता. त्यानंतर सातत्याने 20 ते 30 दर मिळत आला आहे. महापूर काळात थोडा दर होता पण शेती बुडाली व माल पाठवू शकत नव्हते. त्यानंतर गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या काळात मंदीचे सावटामुळे जेमतेम दर मिळाला. परिस्थीती सुधारुन पाडवा व लग्न हंगामात दर मिळेल या अपेक्षेने शेतक-यांनी फुलांची लागवड केली. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे फुले न तोडण्याची अथवा टाकून देण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. 

या भागात घेतले जाते उत्पादन 

शिरोळ तालुक्यातील कोथळी, दानोळी, नांदणी, शिरढोण, जांभळी तर हातकणंगले तालुक्यात कुंभोज, नरंदे, रुई, माणगांव, पट्टणकोडोली, इंगळी, माले, मिणचे व सांगली जिल्ह्यात समडोळी, तुंग, कारंदवाडी, अरग, बेडग आदी गावासह कर्नाटक सीमाभागात कागवाड, जुगुळ, शेडबाळ, उगार यासह सर्वच गावात कमी अधिक प्रमाणात शेतक-यांनी झेंडूची लागवड केली आहे. त्यामुळे झेंडूची मळे बहरले असल्याचे दिसून येत आहेत. 

या फुलांची होती लागवड

कलकत्ता, अॅरोगोल्ड, गोल्डस्पॉट या जातींच्या फुलांची लागवड केली जाते. 

या बाजारपेठेत जातो माल

महाराष्ट्रातील मुंबई, कोल्हापूर, मिरज तर कर्नाटकातील बेळगांव यासह शहरात फुलांना मागणी असते. मुंबई बाजारपेठेत दररोज शिरोळ व हातकणंगले भागातून सरासरी 80 टनाच्या आसपास झेंडू फुले पाठविली जातात. स्थानिक बाजारपेठेतील विक्री कमी प्रमाणात असते.

गुढी पाडवा व लग्न हंगामात दर मिळेल या अपेक्षेने फुलशेती केली. पण कोरोना व्हायरसने आमचे मोठे नुकसान केले. फुलांची झाडे टिकविण्यासाठी व पुढील कळ्या उमलण्यासाठी उमललेली फुले तोडून टाकण्याशिवाय आम्हा पर्याय उरला नाही. 

नंदू रनवरे -फूल उत्पादकशेतकरी, जैनापूर

गेल्या सात महिन्यापासून फुलाला दर मिळत नाही. आठ दिवसापूर्वी जेमतेम दर होता. गुढीपाडव्याला दर मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र कोरोनामुळे सगळेच ठप्प झाले आहे. शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

महावीर मुदकान्ना, भरतेश खवाटे - शेतकरी फुल उत्पादक संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com