सोलापूर : पीर मंगलबेडा सवारीवर श्री गणेशाच्या मंडपातून पुष्पवृष्टी

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या सोलापुरातील पीर मंगलबेडा सवारीवर श्री गणेशाच्या मंडपातून पुष्पवृष्टी करण्यात आली. यंदाही गणेशोत्सवाबरोबर मोहरम उत्सव एकत्र साजरा होत आहे. देशात मोहरम उत्सवाची वेगवेगळी परंपरा आहे.

सोलापूर : मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या सोलापुरातील पीर मंगलबेडा सवारीवर श्री गणेशाच्या मंडपातून पुष्पवृष्टी करण्यात आली. यंदाही गणेशोत्सवाबरोबर मोहरम उत्सव एकत्र साजरा होत आहे. देशात मोहरम उत्सवाची वेगवेगळी परंपरा आहे.

सोलापुरातील मोहरम उत्सवाच्या विशिष्ट परंपरेत सुमारे तीनशे वर्षे जुन्या पीर मंगलबेडा (अहले हरम) सवारीसह अन्य काही सवारी, ताबुतांना मानाचे स्थान आहे. अठरापगड जातींच्या सहभागातून साजरा होणाऱ्या मोहरम उत्सवात एकात्मता संस्कृतीचे दर्शन घडते.

सोलापुरात सुमारे २६५ सवारी, ताबूत, डोल्यांची प्रतिष्ठापना होते. गेले सहा दिवस विविध मानाच्या पंजांच्या मिरवणुका निघाल्या होत्या. मंगळवारी मोहरमच्या ‘शहादत’दिनी पीर बडा मंगलबेडा (अहले हरम) सवारीची मिरवणूक मंगलमय वातावरणात निघाली.

ज्येष्ठ संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार व कवी बदऊज्जमा बिराजदार यांनी धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक चौपाडात पोहोचल्यानंतर थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव मंडळाच्या गणपती मंडपातून पीर मंगलबेडा सवारीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे, शैलेश पिसे, सुनील शेळके, प्रकाश अवस्थी, पृथ्वीराज दीक्षित, उज्ज्वल दीक्षित आदींनी ही सेवा रुजू केली. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. मिलिंद थोबडे, मुंबई उच्च न्यायालयातील फौजदारी वकील जयदीप माने आदींच्या उपस्थितीत मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक 

शहर में नूर है... दादापीर मशहूर है... चा नारा देत हजारो हिंदू - मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत तेलंगी पाच्छा पेठेतील दादापीर सवारीची मिरवणूक हलगी-ताशांच्या निनादात मोठ्या उत्साहात पार पडली. 

या मिरवणुकीचे नेतृत्व सपार कुटुंबीयांनी केले. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले भाविक महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातून मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सामील झाले होते. 

प्रारंभी तेलंगी पाच्छा पेठेतून निघालेली ही मिरवणूक भारतीय चौक, बाराईमाम चौक, विजापूर वेस, माणिक चौक, सोन्या मारुती, दत्त चौक, आसार मैदान येथून पुन्हा याच मार्गाने तेलंगी पाच्छा पेठेतील दादापीर तालीम येथे समारोप करण्यात आले. 
ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी दादापीर सवारीचे उत्सव अध्यक्ष अमित सपार, उपाध्यक्ष मोहन सपार, खजिनदार किरण सपार, सचिव शिवराज सपार, मिरवणूक प्रमुख यशवंत एकबोटे, सिद्राम पल्लाटी, जनार्दन फसलादी, आनंद गदगे यांच्यासह हिंदू-मुस्लिम कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flowers from Shri Ganesh mandap on Pir Mangalbeda Sawari