Women's Day 2019 : फोकस करा...जग जिंका..!

Women's Day 2019 : फोकस करा...जग जिंका..!

लोक काय म्हणतील, याकडे लक्ष देऊ नका. स्वत:ला योग्य वाटत असेल तर, कोणतीही गोष्ट करण्यास डगमगू नका. आयुष्यात संधी मिळत नसते. ती मिळवावी लागते. त्याची क्षमता प्रत्येक मुलीत असते. जेवढा धोका पत्कराल, तेवढे जास्त चांगलं मिळविण्याची शक्‍यता असते. मात्र, हे करताना आपल्या आई-वडिलांना आणि स्वत:ला कधीही फसवू नका. त्यांच्या विश्‍वासाला तडा जावू देऊ नका. त्यामुळे तुमच्या मागच्यांची संधी डावलली जाण्याचा धोका असतो. करिअरवर फोकस करा, आपण जग जिंकू शकता.

पारंपरिक दृष्टिकोन बदलला पाहिजे

आपल्याकडे शालीन असणे आणि आत्मविश्‍वासाने वागणे, याला चुकीचे कंगोरे देण्यात आले आहेत. मान खाली घालून चालणारी, नजर चोरणारी म्हणजे शालीन, प्रश्‍न उपस्थित करणारी, आत्मविश्‍वासाने बोलणारी, हसणारी म्हणजे फालतू, हे समज बदलले पाहिजेत. मुलींनी ही भीती व बंधनातून बाहेर आले पाहिजे. आत्मविश्‍वास वाढवला पाहिजे. नजर झुकवून का चालायचे, नजरा त्यांनी झुकवायच्या, जे काही खराब करत आहेत. प्रामाणिक वाटचाल करत असला तर, कोणालाही खाबरण्याची व दबण्याची गरज नाही. पालकांनीही विचारांची जुनी-जळमटे काढून टाकली पाहिजेत. समाजही ते चांगल्या पद्धतीने स्वीकारत आहे. आपल्या आजीला जी वागणूक मिळत होती, ती आपल्या मुलीला आपण देत नाही.

आई नावाच्या महिलेची मोठी जबाबदारी

संस्कारची बिजे पुढच्या पिढीत रुजवण्याचे काम एक महिलाच करत असते. तिला आई म्हणतात. परंतु, तिही मुलाला जास्त महत्त्व देते, मुलीला तिच्या म्हणण्यानुसार वागायला, त्याची सेवा करायला सांगत मुलगा व मुलगी भेदाचीच शिकवण न कळतपणे देत असते. मुलगा-मुलगी हा भेदभाव विसरून तिने घरातमध्ये समानतेची शिकवण दिली पाहिजे. आपोआप ती दोघांत उतरते. मुलीला जसे हे चांगले, हे वाईट, हे कर, ते करू नको, असे आई सांगत असते, त्यापेक्षा जास्त पटीने मुलाला शिकवले पाहिजे. दुसऱ्याची मुलगी ही आपल्या बहिणीप्रमाणेच आहे. त्यांच्याकडे वाईट नजरेने बघू नको, चांगले वाग, हे ठासून शिकवाल तर, कोणाच्याही मुलींना त्रास होणार नाही. त्यामुळे आईची जबाबदारी मोठी आहे.

अन्याय सहन करणाराही दोषी

छेडछाडीच्या तक्रारी करण्याला अनेक मुली व महिला घाबरत असतात. शिक्षण किंवा नोकरी बंद होईल, या भीतीने मनात घर केलेले आहे. हिनेच काही तरी केले असेल, असे म्हणण्याची आपल्या समाजाची पारंपरिक मानसिकता काही प्रमाणात या भीतीला कारणीभूत आहे. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो, असे महात्मा गांधी म्हणायचे. त्यामुळे चूक करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. गप्प बसून उपयोग होणार नाही. आवाज उठवायलाच पाहिजे. महिला शिक्षिका, सहकारी तसेच कुटुंबातील सदस्यांशी बोलायलाच पाहिजे. पालकांनीही समजून घेऊन मुलींचे प्रश्‍न सोडविले पाहिजेत. त्यांना बोलण्यासाठीचा आत्मविश्‍वास व स्पेसही दिला पाहिजे.

आपणच होऊ आपले आधार

महिलांना खाली खेचण्यासाठी पुरुषांची गरज नाही, असे अनेक गोष्टींतून दिसून येते. महिलाच महिलांच्या शत्रू बनतात. सासू-सून-नणंद या सर्व महिलाच आहे. त्याच एकमेकींना त्रास देण्यात पुढे असतात. वर्गामध्ये असो किंवा कोणत्याही स्पर्धेत मुली या दुसऱ्या मुलीशीच स्पर्धा करतात. जो सर्वांत बेस्ट आहे, त्याच्याशी करत नाहीत. त्यामुळे नकळत आपणच आपला मार्ग रोखत असतो. वास्तविक दुसरीशी स्पर्धा करण्याऐवजी स्वत:शीच स्पर्धा केली पाहिजे. त्यातून आपली उन्नती होते. त्याचबरोबर दुसऱ्या मुलीला-महिलेला सपोर्ट करत एकमेकींचे आधार बनले पाहिजे. आई जशी मुलीची सखी, आधार असते, तसे प्रत्येक महिलेने एकमेकीचे बळ बनले पाहिजे. त्यातून सर्वांनाच पुढे जाता येईल.

आत्मविश्‍वास, जबाबदारीची जाणीव हवी

स्वत:ला योग वाटेल, ते करायला कधीच मागे-पुढे पाहू नका. तुम्ही यशस्वी झाल्यावर बोलणारेच स्तुती करायला लागतील. प्रत्येकाच्यात क्षमता आहे. आत्मविश्‍वास निर्माण करा. धोका पत्करायला शिका. "हाय रिस्क-हाय बेनिफिट' हे सूत्र नेहमी लक्षात ठेवा. त्याचबरोबर कोणतीही कृती करताना आपली खरंच तेवढी क्षमता आहे ना, आपल्या पूर्ण गांभीर्याने ती गोष्ट करायची आहे ना, हे एकदा स्वत:शी ठरवा. स्वत:ची आणि आई-वडिलांची फसवणूक करू नका. त्यांच्या विश्‍वासाला तडा जाईल, असे कधीही वागू नका. त्यामुळे त्यांनी आपल्याला दिलेली संधी वाया जाईल. परंतु, आपल्या नंतरच्या भावंडांना, मुलांना मिळणारी संधीही तुम्ही घालवणार आहात, याचे भान ठेवा. करिअरवर फोकस करून वाटचाल करा, अन्य मोहांना बळी पडू नका. प्रत्येक गोष्ट आपण मिळवू शकतो, प्रत्येक धेय गाठू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com