चारा छावण्या सुरूच राहणार - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

पशुपालकांना दिलासा
माण, खटाव, फलटणमध्ये अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे अजूनही पिण्यासाठी पाणी व जनावरांसाठी चारा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे आतासुद्धा मोठ्या प्रमाणात टॅंकर व चारा छावण्या सुरू आहेत. शासनाने चारा छावण्यांसाठी दिलेली मुदत 31 जुलै रोजी संपल्यावर जनावरे जगवायची कशी असा प्रश्न पशुपालकांना पडला होता.

दहिवडी - सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील पावसाचे अत्यल्प प्रमाण लक्षात घेता अजूनही पुरेसा चारा, पाणी उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे चारा उपलब्ध होईपर्यंत जनावरांच्या छावण्या बंद करण्यात येणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

पशु संवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आश्‍वासन देताना याबाबतच शासन निर्णय लवकरच काढला जाईल, असेही सांगितले असल्याचे मंत्री जानकर यांच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ वीरकर यांनी आज सांगितले.

या संदर्भात सोमवारी मंत्री जानकर यांच्या सातारा येथील दौऱ्यात वीरकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे वस्तुस्थिती मांडून चारा छावण्या सुरू ठेवण्याची विनंती केली होती. त्यावर मंत्री जानकर यांनी चारा उपलब्ध होईपर्यंत चारा छावण्या बंद करण्यात येणार नाहीत, असे सांगून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मंत्री जानकर यांनी चारा छावण्यांचा मुद्दा उपस्थित केला, तसेच दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू ठेवण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही मंत्री जानकर यांची मागणी मान्य करत चारा छावण्या सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती वीरकर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fodder Depo Devendra Fadnavis