सकाळी धुकं; दुपारी उन्‍हाचा ‘तडाखा’

सकाळी धुकं; दुपारी उन्‍हाचा ‘तडाखा’

कोल्हापूर - चैत्रवणव्याचा अक्षरश: दमवून टाकणारा फुफाटा सुरू असतानाच आज पहाटे पाच ते सव्वासातच्या दरम्यान दाट धुक्‍यात शहर गडप झाले. सकाळी भर उन्हाळ्यात थंडीचा अनुभव नागरिकांनी घेतला; मात्र ही थंडी साडेसात ते पावणेआठपर्यंतच टिकली. पुन्हा उन्हाची काहिली सुरू झाली. 

गेल्या दहा वर्षांत प्रथमच ऐन उन्हाळ्यात शहर परिसरात धुके पडले होते. दरम्यान, वाढत्या तापमानाचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, नाक-कानातून रक्त वाहणे, धाप लागणे असे त्रास होत आहेत. 

कसबा बावडा, रमणमळा, न्यू पॅलेस परिसर, जुना बुधवार पेठ, रंकाळा परिसर, फुलेवाडी, शुक्रवार पेठ, गंगावेस, मस्कुती तलाव, शनिवार पेठ, दुधाळी, साने गुरुजी वसाहत भागांमध्ये नदी, तलावाच्या सान्निध्यामुळे सकाळी धुक्‍याचे प्रमाण जास्त होते. कामावर लवकर बाहेर पडणारे, कामानिमित्त शहर परिसरात येणाऱ्यांनी धुक्‍यामुळे फॉगलाईट लावले होते. धुक्‍याचे हे दाट थर जिथे झाडी भरपूर आहे तिथे रेंगाळले होते; मात्र सकाळी ३४ ते ३५ डिग्री सेल्सिअसवर असलेला पारा नऊ वाजल्यापासून वाढला. दुपारी साडेबारा ते एक दरम्यान पारा थेट ४२ डिग्री सेल्सिअसवर गेला. दुपारीही वाऱ्याचा जोर नसल्यामुळे निर्माण झालेल्या उष्ण लाटांनी रस्ते ओस पडले होते. 

  नागरिक दुपारी गॉगल, टोप्या वापरून अन्‌ डोक्‍याला, तोंडाला सुती कापड गुंडाळूनच बाहेर पडत होते. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना तापमानाचा हा तडाखा असह्य झाला. दिवसभर घरघरणाऱ्या पंख्यामुळे तर गरम हवाच अंगावर येत होती. यामुळे अनेकांनी पंखा बंद करून गच्चीवरील, अंगणातील सावलीत दुपारी विसावणे पसंत केले. कडक उन्हामुळे परिसरातील जलस्रोत वेगाने आक्रसत आहेत. परिणामी उन्हाळी पिके, गुराढोरांना आणि पक्ष्यांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्याची शक्‍यता आहे.    

गुलाल धुऊन निघेल?  
श्री जोतिबा यात्रा झाल्यानंतर गुलाल धुऊन टाकण्यासाठी वळीव धावून येतो, असे नेहमी म्हटले जाते; पण यात्रा संपूनही वळीव अजून आलेला नाही. गेली चार वर्षे यात्रा झाल्यानंतरही वळीव वेळेत पडलेला नाही. मागील वर्षी तो मेमध्ये झाला.  

मराठवाडा अन्‌ कोल्हापूर 
यातही आज ४२ डिग्री सेल्सिअस तापमान नोंद झाले; पण मराठवाड्याचा प्रदेश मैदानी असल्यामुळे उष्ण वारे आणि उन्हाचा चटका जीवघेणा ठरतो. कोल्हापुरात पारा ४२ पर्यंत जाऊनही शहर व परिसरात तसेच जिल्ह्यात झाडांची दाटी असल्याने मराठवाड्यासारखी बिकट स्थिती झाली नाही.

प्रभाव अजून दोन दिवस 
दुपारी ४२ डिग्री सेल्सिअवर गेलेला पारा साडेतीन वाजता ३९ डिग्री सेल्सिअसवर आला. तरीही संध्याकाळी सुटणाऱ्या गार वाऱ्याचे प्रमाण अत्यल्प राहिले. यामुळे उकाड्यात तसूभरही फरक पडला नाही. सकाळी दवबिंदू प्रमाण शून्य टक्के, पर्जन्य शक्‍यता प्रमाणही शून्य टक्के होते; मात्र साडेतीन वाजता दवबिंदू प्रमाण चार टक्‍क्‍यांवर गेले. आज दिवसभर आकाशात शून्य ते एक टक्के ढगांचे प्रमाण होते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ११ ते २७ टक्केदरम्यान राहिले. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सौराष्ट्र आणि कच्छ परिसरात उष्णतेची लाट आल्यामुळे वाळवंटी भागातून ४० डिग्री सेल्सिअसयुक्त वारे राज्यात येत आहेत. यामुळे येणाऱ्या दोन दिवसांत पारा चाळिशीच्या पुढेच राहील. ॲक्‍युवेदर संकेतस्थळाने तर आज ४४ डिग्री सेल्सिअसपर्यंत कोल्हापूर परिसराचे तापमान जाईल, अशी शक्‍यता वर्तविली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com