धुक्‍यातील पर्यटनाची पर्यटकांना साद

वनकुसवडे पठार (ता. पाटण) - आनंदाची अनुभूती देणारी धुक्‍यातली वाट.
वनकुसवडे पठार (ता. पाटण) - आनंदाची अनुभूती देणारी धुक्‍यातली वाट.

नागठाणे - समोर, मागे, अवतीभोवती जिथे पाहावे तिथे धुकेच धुके. जिथे नजर पोचेल तिथेही धुकेच. धुक्‍यातील हा प्रवास कित्येक किलोमीटर अंतराचा. हे चित्र आहे वनकुसवडे परिसरातील. तिथला धुक्‍याचा प्रवास सध्या पर्यटकांना साद घालत आहे.

एरवी वर्षा पर्यटन म्हटले, की कास अन्‌ ठोसेघर ही प्रकर्षाची स्थळे. त्यात आता या धुक्‍यातील पर्यटनाची भर पडताना दिसत आहे. ठोसेघरचा धबधबा पाहून पर्यटक परतीचा मार्ग धरतात. मात्र, तिथून पुढे गेले, की चाळकेवाडीचे पठार लागते. या पठारावरची सपाटीची डांबरी वाट पाटणला जाते. सुमारे ५० किलोमीटरवर हे अंतर आहे. दोन्ही बाजूला शेकडो पवनचक्‍क्‍या भिरभिरत असतात. हा सारा आसमंत सदैव धुक्‍यांनी वेढलेला असतो. अगदी दहा फुटांवरचे दृश्‍य दिसणे कठीण ठरते. त्यामुळे वाहनचालकांना वाहनांचे दिवे लावून प्रवास करणे क्रमप्राप्त ठरते. सध्याच्या पावसाळी हंगामात हे धुके कधीही कमी होत नाही. अगदी दिवसभर काळोख पांघरल्याचा भास होत असतो. परिसरात पावसाची संततधारच सतत सुरूच असते.

मानवी वस्ती अगदीच तुरळक असल्यामुळे वाहने, गजबजाट यापासून हा परिसर दूर आहे. या प्रवासात रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली हिरवळ, त्यातून वाहणारे पाण्याचे फेसाळते प्रवाह, पवनचक्कीच्या पात्यांचे शीळ घातल्यासारखे होणारे विशिष्ट आवाज पर्यटकांना पर्वणी ठरणारे आहेत.

कसे जाल?
सातारा शहरातून बोगदामार्गे सज्जनगड रस्त्याने प्रथम ठोसेघरला जावे लागते. तिथून एक किलोमीटर अंतरावर चाळकेवाडी येते. चाळकेवाडीतून डाव्या बाजूला चिखली गावाकडे जाणारा मार्ग आहे. मात्र, तिकडे न जाता सरळ पठाराकडे जाणारा डांबरी मार्ग आहे. तोच धुक्‍याच्या वाटेवर घेऊन जातो.

काय पाहाल?
सज्जनगड, ठोसेघर, जगमीनचा तलाव ही प्रेक्षणीय ठिकाणे पाहून चाळकेवाडीतून धुक्‍याचे पठार पाहता येते. वनकुसवडेनजीक पवनचक्‍क्‍या आहेत. तिथून काठी या गावात गेल्यावर कोयना धरणाचे ‘बॅक वॉटर’ नजरेस पडते. पाटणला पोचण्यापूर्वी धारेश्वर हे धार्मिक स्थळ तसेच सुंदर दातेगड हा किल्ला पाहता येतो.

काय काळजी घ्याल?
वाटेवर सर्वत्र धुके तसेच निसरड्या वाटा यामुळे वाहने चालवताना विशेष खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. परिसरात अनेक रस्ते असल्यामुळे मूळचा रस्ता न सोडणे गरजेचे. अन्यथा वाट चुकण्याची शक्‍यता. परिसर निर्मनुष्य असल्यामुळे गटाने जाणे हिताचे. परिसरात दुकाने, हॉटेल्स अजिबात नाहीत. त्यामुळे खाद्यपदार्थ सोबतीला असावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com