अतिउत्साहामुळेच फुटबॉल गोत्यात

कोल्हापूर - शाहू स्टेडियमवर सामना पाहण्यास आलेल्या प्रेक्षकांकडून एखाद्या संघाने गोल केल्यावर कपडे काढून अतिरेकी जल्लोष केला जातो.
कोल्हापूर - शाहू स्टेडियमवर सामना पाहण्यास आलेल्या प्रेक्षकांकडून एखाद्या संघाने गोल केल्यावर कपडे काढून अतिरेकी जल्लोष केला जातो.

कोल्हापूर - अतिउत्साही समर्थकांनीच कोल्हापूरचा फुटबॉल गोत्यात आणला, अशीच सर्वसाधारण प्रतिक्रिया आज फुटबॉल सामन्यांच्या स्थगिती निर्णयावर उमटली. स्पर्धा स्थगित करण्यापेक्षा अतिउत्साही समर्थकांना रोखण्यासाठी सर्व फुटबॉल संघांच्या प्रमुखांनी पुढाकार घ्यावा. पोलिस कारवाई झाली तर या समर्थकांना सोडवण्यासाठी प्रयत्न करू नका. पोलिस कोठडीची हवा त्यांना खाऊ द्यावी, असा संतप्त सूर सच्च्या फुटबॉलप्रेमींतून व्यक्त झाला.

स्टेडियममधील ठराविक गॅलरी ठराविक पेठेसाठी ही मक्तेदारी मोडून काढावी, अशाही भावना फुटबॉलप्रेमींनी व्यक्त केल्या. चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने सामन्यानंतर जी हुल्लडबाजी व दगडफेक झाली, त्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनने पुढील स्पर्धा स्थगित ठेवण्याचाच निर्णय घेतला. बहुतेकांनी बरे झाले, असे मत व्यक्त करताना अतिउत्साही समर्थकांना धडा शिकवावा, अशा शब्दात निर्णयाचे स्वागत केले. परंतु, स्पर्धा बंद न करता मैदानावर कडक सुरक्षा यंत्रणा राबवावी, कोणाचीही गय करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

समर्थकांशिवाय फुटबॉल खेळात चैतन्य येत नाही, हे खरेच आहे. किंबहुना, फुटबॉल हा क्षणाक्षणाला रोमांचकता वाढवणारा खेळ आहे; पण समर्थकांनी किती उत्साह दाखवावा, याला काही मर्यादा आहेत. कोल्हापूरच्या फुटबॉलच्या वाढीस समर्थकांची साथ जरूर लाभली आहे. परंतु, ते सच्चे समर्थक काळाच्या ओघात बाजूला पडले आहेत. नव्या पिढीतील समर्थकांत नको इतकी टोकाची ईर्ष्या भिनली आहे. त्यांना आपल्या संघाच्या पलीकडे दुसरा कोणी संघ तुल्यबळ आहे, हेच पटत नाही. काहीही करून आपलाच संघ जिंकला पाहिजे, ही त्यांची भावना आहे. तसे झाले नाही, तर हे समर्थक आक्रमक होतात. जसजसा त्यांचा संघ पराभवाच्या दिशेने जाईल, तसतसा त्यांचा आक्रमकपणा वाढतो. तो त्यांच्या कृतीतून हावभावातून व्यक्त होतो.

मग काही जण अंगावरचे शर्ट काढतात. पाण्याच्या बाटलीतून जे भरून आणलेले असते, ते तोंडाला लावतात. पंचाच्या प्रत्येक निर्णयावर ते शिवीगाळ करतात. राग वाढला, की मैदानाच्या दिशेने बाटल्या फेकतात आणि या परिस्थितीत त्यांच्या संघाचा पराभव झाला तर तो सारा राग दगडफेक करून काढतात. पराभवाचे खापर पंचांवर फोडतात. के.एस.ए.च्या नावाने खडे फोडतात. काही वेळा पंचांकडूनही चूक होते; पण त्याचेच मोठे भांडवल केले जाते. स्टेडियमबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली जाते. यावेळी त्यांना रोखण्यास कोणी नसते, त्यामुळे त्यांचे धाडस वाढते व आपण खूप धाडसी आहोत, आपल्या नादाला कोणी लागू शकत नाही, अशी या समर्थकांची समजूत आणखी घट्ट होते.

तालमींची ईर्ष्या काहींना हवीच आहे...
केवळ समर्थकांना दोष देऊन हा विषय संपत नाही. काही खेळाडूही केवळ ईर्ष्येने भारलेले आहेत. खिलाडूवृत्ती हा शब्द त्यांच्या कोशात नाही. पंचांनी त्यांना काही समजावून सांगायचा प्रयत्न केला तर त्यांचा बी.पी. वाढतो. ‘भावा, मला असलं काही सांगायचं नाही,’ असा दम तो खेळाडू, पंचाला देतो.

एवढेच काय, आपल्या खेळाडूकडून गोल हुकला तर त्यालाही शिव्या देण्याची मजल या खेळाडूंकडून जाते. याशिवाय ही पेठ, ती पेठ अशी ईर्ष्या तर खूप खोलवर भिनली आहे. काही राजकीय नेते, काही तालमींना ही ईर्ष्या हवी आहे. कारण त्यातून त्यांना राजकारण टिकवायचे आहे. त्यामुळे कोल्हापुरातले सर्व ज्येष्ठ खेळाडू, संघांनीच आता विचार करण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com