जंगलातील पाणवठ्यांवर प्राण्यांची वर्दळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

निवी (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी धुळवड साजरी न करता वन्यप्राण्यांसाठी जंगलालगतच्या ओढ्यावर श्रमदानाने बांधलेल्या बंधाऱ्यासह साफसफाई केलेल्या पाणवठ्यांवर आता वन्यप्राण्यांची वर्दळ वाढली आहे.

ढेबेवाडी - निवी (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी धुळवड साजरी न करता वन्यप्राण्यांसाठी जंगलालगतच्या ओढ्यावर श्रमदानाने बांधलेल्या बंधाऱ्यासह साफसफाई केलेल्या पाणवठ्यांवर आता वन्यप्राण्यांची वर्दळ वाढली आहे. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत जवळच्याच घोटील (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनीही वनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी दोन पाणवठ्यांची नुकतीच सफाई करून पाण्याचा बुजलेला प्रवाह मोकळा केला. 

उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटल्यानंतर वन्यप्राणी जवळच्या गावांकडे कूच करत असल्यामुळे उपद्रव वाढून अनेक समस्या उभ्या राहतात. या पार्श्वभूमीवर वनविभागातर्फे प्रतिवर्षी जंगलातील पाण्याच्या स्त्रोतांची स्थानिकांच्या मदतीने साफसफाई करण्याबरोबरच छोटे बंधारे व तळी बांधून प्राण्यांना जंगलाबाहेर पडण्याची वेळ येणार नाही याची काळजी घेतली जाते.

धुळवडी दिवशी निवीच्या ग्रामस्थांनी जंगलातील ओढ्यावर श्रमदानाने दगडी बंधारा बांधून पाणवठ्यांची साफसफाईही केली. आता त्यात चांगला पाणीसाठा झाल्याने गव्यांसह अन्य वन्यप्राण्यांची तिथे वर्दळ वाढल्याचे चिखलात उमटलेल्या पायांच्या ठशांवरून लक्षात येत आहे. निवीकरांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जवळच्याच घोटीलच्या ग्रामस्थांनीही नुकतीच जंगलातील पाणवठ्यांची श्रमदानाने साफससफाई करून गाळ व पालापाचोळा पडून बुजलेला पाण्याचा प्रवाह मोकळा केला. वनक्षेत्रपाल विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी. के. जाधव, वनरक्षक जे. आर. बेंद्रे, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती पाटील व कृष्णत पुजारी यांच्यासह सुरेश सुतार, धनाजी पवार, दत्तू पवार, गणेश जाधव, शामराव पवार, अंकुश पवार, आनंदा जाधव, प्रकाश पवार आदी ग्रामस्थ त्यामध्ये सहभागी झाले होते.

अंधांचाही सहभाग...
ग्रामस्थ वन्यप्राण्यांसाठी जंगलातील पाणवठ्यांची साफसफाई करण्यासाठी निघाल्याचे समजताच घोटील गावातील अंध ग्रामस्थ प्रकाश पवार यांनीही आपल्याला सोबत नेण्याचा आग्रह त्यांच्याकडे धरला. जंगलात चालत जाऊन तेही या मोहिमेत सहभागी झाल्याने ग्रामस्थांसह वन्यकर्मचाऱ्यांचा उत्साह आणखी वाढला. श्रमदानातून आपल्याला मोठा आनंद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Forest Waterfall Animal