
रायगडावरील राज्याभिषेक दिनाप्रमाणे शिवप्रताप दिन भव्य साजरा व्हावा अशी मागणी एकबोटे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.
सातारा : भाजप सरकारने पाच वर्षांत प्रतापगडासाठी काहीच केले नाही. पूर्णपणे दुर्लक्ष केले. हिंदूत्ववादी, शिवभक्त म्हणून त्यांची जबाबदारी होती; पण त्यांनी ती पाळली नाही. आज जे दिवस आले ते त्यांच्या चुकांचे फळ आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतापगडावरील भवानी मातेचे दर्शन घेतले असते, तर ही वेळ आली नसती, असा आरोप शिवप्रतापगड उत्सव समितीचे मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत केला.
श्री. एकबोटे म्हणाले, ""श्री. फडणवीस, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, विजय शिवतारे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदारांना शिवप्रताप उत्सव साजरा करण्यासाठी पाच वर्षे निमंत्रण देत होतो; पण ते एकदाही आले नाहीत. सरकारने पाच वर्षे प्रतापगडाकडे दुर्लक्ष केले. या गडावर गेल्यानंतर तेथे इतिहास घडला आहे, असे वाटतच नाही. संपूर्ण देशाला प्रेरणा देणारा हा दिवस असल्याने तो लाल किल्ल्यावरही साजरा करावा.''
शिवप्रताप दिन सर्व घटकांना विश्वासात घेऊन साजरा करावा
शिवप्रताप दिन हा राष्ट्रीय उत्सव असल्याने प्रशासनाने उत्साहात तयारी करून तो साजरा करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करावी. पालकमंत्र्यांसहीत सर्व लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाला उपस्थितीत राहण्याचे बंधन असावे. शिवरायांच्या पराक्रमाचे चित्र प्रतापगडावर लावावे. शिवप्रताप दिनाबद्दल बांधिलकी असलेल्या सर्व घटकांना विश्वासात घेऊन हा दिवस साजरा करावा, ऐतिहासिक वक्ते, मान्यवर, निवृत्त लष्करी अधिकारी यांनी कार्यक्रमास उपस्थितीत राहण्यासाठी प्रयत्न करावेत. रायगडावरील राज्याभिषेक दिनाप्रमाणे शिवप्रताप दिन भव्य साजरा करावा, आदी मागण्याही श्री. एकबोटे यांनी केल्या. या वेळी अधिवक्ता गोविंद गांधी, ऍड. दत्तात्रेय सणस आदी उपस्थित होते.
शिवपुतळ्यास शासकीय मानवंदना द्यावी
1996 ते 2003 पर्यंत आम्ही हा उत्सव साजरा करत होतो. त्या वेळी राज्यभरातील शाहीर, मान्यवर बोलावत होतो. 20 हजार लोकांना प्रसाद देत होतो. शासनाने आम्हालाही उत्सव साजरा करण्याची संधी द्यावी. अफजल खानाचा वध हा शिवाजी महाराजांची सर्वोच्च ऐतिहासिक कामगिरी आहे. त्यामुळे शिवपुतळ्यास शासकीय मानवंदना द्यावी, तसेच प्रत्येक शाळा, महाविद्यालयांत हा दिवस साजरा केल्यास त्यातून विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीची, दहशतवादाविरोधात लढण्याची प्रेरणा मिळेल, असेही श्री. एकबोटे यांनी सांगितले.