कोल्हापूरच्या माजी उपमहापौर शमा मुल्लांसह २१ अटकेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

कोल्हापूर - यादवनगरातील सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छाप्यावेळी पोलिसांवर झालेल्या हल्लाप्रकरणी संशयित माजी उपमहापौर शमा मुल्लांसह २१ जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. हल्लेखोरांवर दरोडा, खुनी हल्ल्यासह पोलिसांना धक्काबुकी, असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

कोल्हापूर - यादवनगरातील सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छाप्यावेळी पोलिसांवर झालेल्या हल्लाप्रकरणी संशयित माजी उपमहापौर शमा मुल्लांसह २१ जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. हल्लेखोरांवर दरोडा, खुनी हल्ल्यासह पोलिसांना धक्काबुकी, असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

सीसीटीव्ही फुटेजवरून ४० संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. मुल्लासह त्याच्या साथीदारांचा आणि त्यांनी लंपास केलेल्या रिव्हॉल्व्हरचा युद्धपातळीवर शोध सुरू असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज सांगितले. 

गुन्हा दाखल झालेले संशयित असे - माजी उपमहापौर शमा मुल्ला (वय ४०), सज्जाद ईसाक नाईकवडी (५२), शाहरूख रफीक लाड (२४), उमेद मुजाहिद्द मोमीन (२०), जावेद शौकत नाचरे (२१), अजय बाळासाहेब कांबळे (४७), साहिल नियाज मुजावर (२०), ओंकार रवींद्र पारिसवाडकर (३३), श्रीधर शिवाजी कांबळे (२३), मुश्‍फिक त्रबिखान पठाण (२७), रोहित बाळू गायकवाड (२०), साहिल अमित नदाफ (२४, सर्व रा. यादवनगर), दिलीप वामन कवडे (४०), तौफिक सद्दाक शिकलगार (३८, दोघे रा. सदर बाजार), फिरोज खलील मुजावर (५०), विजय मारुती सागावकर (४३, रा. शाहूनगर), आरिफ रफिक शेख (२४, रा. राजोपाध्येनगर), आकाश लक्ष्मण पोवार (१८), जमीर साहेबजी मुल्ला (२८ रा. राजारामपुरी), ईमल आदम मुल्ला (वय ४०, रा. शास्त्रीनगर). 

यादवनगरात सलीम मुल्लाच्या नेतृत्वाखालील राजू मुल्ला, यासीन मुल्लाच्या मटका अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी अप्पर पोलिस अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा यांनी काल रात्री छापा टाकला. त्यांच्या पथकात आठ जणांचा समावेश होता. छाप्यावेळी अंगरक्षक कॉन्स्टेबल निरंजन पाटील यांच्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मुल्लाच्या साथीदारांनी हिसकावून घेतले. त्यानंतर त्यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांवर ते रोखून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुल्लाचे साथीदार रिव्हॉल्व्हरसह पाच राऊंड घेऊन पसार झाले. दरम्यान, कारवाई करू नये, यासाठी मुल्ला व माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्या सांगण्यावरून जमावाने पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. झटापटीत पोलिस निरंजन पाटील व ज्ञानेश्‍वर विठ्ठल माळी जखमी झाले. 

या प्रकाराची अधीक्षक डॉ. देशमुख यांनी गांभीर्याने दखल घेतली. ते स्वतः आज सकाळपर्यंत घटनास्थळी ठाण मांडून होते. याप्रकरणी माजी उपमहापौर शमा मुल्लांसह ३० ते ४० जणांवर दरोडा, खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, पोलिसांना धक्काबुक्की, मारहाण असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाईत पोलिसांनी एक लाख ३६ हजार ११० रुपयांच्या रोकडसह लॅपटॉप, जुगाराचे साहित्य असा एकूण एक लाख ५० हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

याप्रकरणी आज सकाळी पोलिसांनी शमा मुल्लांसह २१ जणांना अटक केली. त्यांना मोठ्या बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्वांना १५ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली. संशयित सलीम मुल्ला, फिरोज मुल्ला, जावेद मुल्ला, त्यांचे साथीदार आणि पळविलेले रिव्हॉल्व्हर व त्यातील पाच राऊंडचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिस निरीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत. 

सीसीटीव्हीतून ४० जण निष्पन्न
सीसीटीव्ही फुटेजवरून मटका अड्ड्यातील सुमारे ४० जणांची नावे पुढे आली आहेत. त्यानुसार त्यातील अनेकांना अटक केली आहे. पसार झालेल्यांची धरपकड सुरू असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

नातेवाइकांची गर्दी
संशयितांना दुपारी पोलिस ठाण्यातून न्यायालयात नेण्यात आले. त्यावेळी नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राज्य राखीव दलाची मदत घेण्यात आली होती. संशयितांना न्यायालयात नेत असल्याचे पाहून त्यांच्या नातेवाइकांनी आरडाओरड केली. यादवनगरातही पोलिसांचा बंदोबस्त आजही तैनात होता. 

लोकप्रतिनिधींच्या आधाराचा प्रयत्न
पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईनंतर दाखल गुन्ह्यांची किंवा अटक टाळण्यासाठी अनेकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस ठाण्यात नगरसेवक नियाज खान यांच्यासह काही जण आले होते. तपासात अडथळा नको, असे पोलिसांकडून सांगताच ते तेथून निघून गेले.

अहवाल आयुक्तांकडे पाठविणार...
आचारसंहितेच्या काळात एखाद्या नगरसेवकांवर गंभीर गुन्हे दाखल असल्यास त्याचे सदस्यपद रद्द करण्याची तरतूद आहे. ही दीर्घकालीन प्रक्रिया असली तरी संशयित शमा मुल्ला यांच्याबाबत काल दाखल झालेल्या गुन्ह्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. तो पोलिस दलातर्फे तातडीने महापालिका आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

दाखल गुन्हे...
संशयित सलीम मुल्लावर ५२, राजू मुल्लावर १९, फिरोज मुल्लावर आठ, तर जावेद मुल्लावर तीन गुन्हे दाखल आहेत. यात मटका, जुगारासह जातिवाचक शिवीगाळ, मारामारी, गंभीर दुखापत, दरोडा, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

Web Title: former deputy mayor of Kolhapur Shama Mulla arrested