माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेले व स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणात येवून कॅबिनेट मंत्री राहिलेले माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील (वय 100) यांचे आज पहाटे संगमनेर येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

संगमनेर : स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेले व स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणात येवून कॅबिनेट मंत्री राहिलेले माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील (वय 100) यांचे आज पहाटे संगमनेर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुले, एक मुलगी असा परिवार आहे. संगमनेर येथे त्यांचा मुलगा डाॅ. राजेंद्र खताळ यांच्याकडे ते राहत होते. अरुण, प्रकाश, संजय, डाॅ. राजेंद्र व प्रमिला पाटील (धुळे) ही त्यांची मुले होत. 

 खताळ पाटील यांचा जन्म 26 मार्च 1919 झाला. प्राथमिक शिक्षण धांदरफळ, माध्यमिक व पदवीपर्यंतचे शिक्षण संगमनेर येथे तर कायद्याचे शिक्षण (लाॅ) पुण्यात झाले. लहानपणापासनच समाजसेवेची आवड असल्याने स्वातंत्र्यपूर्व काळात युवावस्थेत त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्यसैनिकांना मदत केली. विडी कामगारांच्या चळवळीत सहभाग घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. वकिली करताना सर्वसामान्यांसाठी ते झटत. नगरबरोबरच औरंगाबाद, सोलापूर, वैजापूर, पुणे न्यायालयात त्यांनी वकिली केली. प्रथमवर्ग दंडाधिकारी म्हणूनही धुळे येथे काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. 1952 मध्ये काॅंग्रेसच पक्षाच्या वतीने संगमनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिली निवडणूक लढविली. या निवडणुकीत दत्ता देशमुख यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 1962 मध्ये काॅंग्रेसकडून त्यांना विधानसभेची पुन्हा संधी  मिळाली. त्यात ते विजयी झाले. त्यानंतर तीन वेळा ते आमदार राहिले. अत्यंत अभ्यासू, सडेतोड वकृत्त्व असलेला नेता म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात खताळ पाटील प्रसिद्ध होते.

मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण आदी दिग्गज नेत्यांसोबत त्यांनी काम केले. अठरा वर्षाच्या मंत्रीपदाच्या काळात त्यांनी पाटबंधारे, सहकार, अन्न व नागरी पुरवठा, महसूल, कृषी, विधी व न्याय, कृषी नियोजन व परिवहन, पाटबंधारे, सिंचन क्षेत्र आदी विविध महत्त्वाच्या खात्यांवर काम केले. संगमनेर तालुक्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले. संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचे ते मुख्य प्रवर्तक होते. १९६९ प्रत्यक्ष कारखाना सुरू झाला त्या वेळी त्यांच्यासोबत दत्ता देशमुख, भाऊसाहेब थोरात, भास्करराव दुर्वे आदी मंडळी होती. संगमनेर नगरपालिका कामगार संघटना, जिल्हा विकास मंडळ, विडी कामगार संघटना आदी संघटनांवर त्यांनी विविध पदांवर काम केले. कोल्हापूरचे दूधगंगा-वेदगंगा, सांगलीचे चांदोली-नांदोली, साताऱ्याचे धोम, पुण्याचे चासकमान, वर्ध्याचे अप्पर वर्धा, नांदेडचे विष्पुरीही ही धरणे खताल पाटील यांच्याच काळात झाली. 

वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून मुक्त होत स्वयंप्रेरणेने प्राणायाम, विपश्चना, चिंतन, मनन यात स्वतःला गुंतवून घेतले. वयाच्ाय ९३ व्या वर्षी त्यांनी लिखानाला सुरूवात केली.त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली. अंतरीचे धावे, गुलामगिरी, धिंड लोकशाहीची, गांधीजी असते तर, लष्करी विळख्यातील पाकिस्तान, माझे शिक्षक ही पुस्तके त्यांची विशेष गाजली.वाळ्याची शाळा हे पुस्तक त्यांचे शेवटचे राहिले.देशातील सर्वात वयोवृद्ध लेखक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former minister b j khatal patil passed away