मागासवर्गीयांचे धान्य बंद करताना पासवानांना लाजही वाटू नये : लक्ष्मण माने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 डिसेंबर 2019

राज्य शासनाने ऑगस्टपासून राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळा वसतिगृहांना होणारा धान्य पुरवठा बंद केल्याने नाराजीचा सूर आहे.

सातारा : अनुदानित आश्रमशाळा वसतिगृहातील धान्य पुरवठा सरकारने बंद केला आहे. राम विलास पासवान हे अन्न पुरवठामंत्री असून, तेही स्वत: मागासवर्गीय आहेत. मागासवर्गीय मुलांचे धान्य बंद करताना त्यांना लाज वाटली पाहिजे होती, अशी टीका भारतीय भटके विमुक्‍त विकास व संशोधन संस्थेचे कार्याध्यक्ष, माजी आमदार, पद्‌मश्री लक्ष्मण माने यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचा -  Video बिबट्या आला हाे....गावागावांत चिंता
 
श्री. माने म्हणाले, ""राज्य शासनाने ऑगस्टपासून राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळा वसतिगृहांना होणारा धान्य पुरवठा बंद केला आहे. गेली 25 वर्षे धान्य पुरवठा केला जात होता. राज्य शासन दरडोई 900 रुपये ऐवढे अनुदान देते. दिवसाला 30 रुपये प्रति विद्यार्थी हे अनुदान असून, त्यात दोनवेळचे जेवण, दोनवेळचा नाश्‍ता मुलांना द्यावा लागतो. बाजारामध्ये वडापास सुध्दा 15 रुपयांना मिळत नाही. अशा स्थितीमध्ये या शाळा चालविणे अशक्‍य होवून बसले आहे. त्यामुळे आमच्या आश्रम शाळेतील आठवी ते 12 मधील मुलांना घेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्यापासून (ता. 18) थाळीनाद आंदोलन करणार आहे. जोपर्यंत धान्य पुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत हे आंदोलनसुरूच राहिल.''

अवश्य वाचा - Video पालिकेत गुंडशाही चालणार नाही - कल्पनाराजे भोसले
 
धान्य पुरवठा बंद झाल्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना पत्र दिले आहे. शिवाय, मंत्र्यांनाही कळवत आहे. याबाबत निर्णय न झाल्यास संस्था बंद करावी लागेल. त्यामुळे एक हजार मुले रस्त्यावर येतील. राज्यात सुमारे 350 तर, जिल्ह्यात 20 आश्रमशाळा आहेत. शासनाने धान्य द्यावे अथवा विकत घेवून आम्हाला पुरवठा करावा, अशी मागणीही श्री. माने यांनी केली. 

जिल्हाधिकाऱ्यांना कशाला बसविले ? 

या प्रश्‍नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो तर ते म्हणतात, "आमच्या हातात नाही, तुम्ही सरकारला कळवावे, हा विषय सरकारचा आहे. सरकार बघेल.' असेच जर म्हणायला लागतात तर शासनाचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला कशाला बसविले आहे. माझ्या दृष्टीने जिल्हाधिकारी म्हणजे सरकारच आहे. राजकर्तेही कोडगे झाले असून, संवेदनाच राहिल्या नाहीत, अशी टिकाही श्री. माने यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Padma Shri Laxman Mane Criticized Ram Vilas Paswan