लातूर : माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर भाजपमध्ये दाखल

हरी तुगावकर
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी गुरवारी रात्री उशिरा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत लातूरमध्ये अखेर भाजपत प्रवेश केला आहे.

लातूर : काँग्रेसमध्ये मानसन्मानाची वागणूक मिळत नाही यामुळे तसेच निवडणुकीत उमेदवारी डावलल्यामुळे सातत्याने नाराज असलेले माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी गुरवारी रात्री उशिरा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत लातूरमध्ये अखेर भाजपत प्रवेश केला आहे.

कव्हेकर यांनी 1995 मध्ये विलासराव देशमुख यांचा पराभव केला होता. त्यावेळेस पासून ते देशमुख यांचे कट्टर विरोधक मानले जात होते. त्यावेळेस पासून कव्हेकर देशमुख यांचे कधी जमले नाही. पण 2009 मध्ये लातूर मतदारसंघाची फेररचना झाली. त्यात लातूर शहर आणि ग्रामीण असे दोन मतदारसंघ झाले. लातूर शहरातून अमित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली.

त्यावेळी विलासराव देशमुख यांनी कव्हेकर यांच्या घरी जाऊन त्यांची नाराजी दूर केली होती. त्यावेळेस कव्हेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गेली दहा वर्षे ते काँग्रेसमध्येच आहेत. 2014 च्या निवडणुकीमध्ये लातूर ग्रामीणमधून आपल्याला उमेदवारी मिळेल असे कव्हेकर यांना वाटत होते, पण त्या वेळेसही त्यांना डावलण्यात आले.

त्यावेळेस पासून कव्हेकर नाराज होते. 2017 मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत कव्हेकर यांनी आपले पुत्र अजित पाटील कव्हेकर यांना भाजपमध्ये पाठवले. भाजपच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढविली. ते नगरसेवक झाले. त्यावेळेपासूनच कव्हेकर भाजपमध्ये जातील अशी चर्चा सुरू झाली होती. पण त्यांनी अधिकृत प्रवेश मात्र केला नव्हता.

2019 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी लातूर ग्रामीणमधून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. जननायक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघ पिंजून काढला होता. या निवडणुकीतही त्यांना डावलण्यात आले. त्यांच्याऐवजी अमित देशमुख यांचे कनिष्ठ बंधू धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे कव्हेकर यांनी एक पत्रक काढून स्थानिक नेतृत्वावर कडाडून टीका केली होती.

त्यात गुरुवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची किल्लारी येथे जाहीर सभा झाली. त्यानंतर लातूरला ते  मुक्कामी होते. मध्यरात्री कव्हेकर व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी येथील एका हॉटेलमध्ये शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची उपस्थिती होती. कव्हेकर यांच्या भाजप प्रवेशामुळे आता निवडणुकीत अधिकच रंग येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Shivajirao Patil Kavekar joins BJP