माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे निधन 

माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे निधन 

कोडोली - पन्हाळा-गगनबावडा-वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे सलग 25 वर्षे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील (दादा) (वय 88) यांचे आज रात्री राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. ते "यशवंत एकनाथ' म्हणून सर्वत्र परिचित होते. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकारणातील जाणते नेतृत्व हरपल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. त्यांच्या पश्‍चात मुलगा, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अमरसिंह पाटील, नातू डॉ. जयंत प्रदीप पाटील, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कोडोली येथील दत्त मठीसमोरील पटांगणावर गुरुवारी सकाळी 10 वाजता पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. 

माजी आमदार पाटील गेले काही दिवस आजारी होते. मंगळवारी (ता. 16) त्यांना उलट्या-जुलाबाचा त्रास झाला. आज त्यांची प्रकृती सुधारत होती. सायंकाळी घराबाहेर बसून ते कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत असताना त्यांना हृदयविकाराच्या झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी वडगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र तेथे पोचेपर्यंत त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त जिल्ह्यात सर्वत्र पसरले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय येथे ठेवण्यात आले. तेथे नागरिकांनी अंत्यदर्शन करण्यासाठी गर्दी केली. 

कोडोली येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या यशवंत एकनाथ पाटील यांनी वारणा खोऱ्यामध्ये कुस्त्या करण्यास प्रारंभ केला. त्यांनी अनेक मैदाने गाजवली. त्यानंतर ते राजकारणाकडे ओढले गेले. कोडोली ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहून त्यांनी आपल्या वक्‍तृत्वाची छाप पाडली आणि ते सदस्य म्हणून निवडून आले. येथून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. विकासाचा मंत्र धरून त्यांनी राजकारणास सुरुवात केली. येथून त्यांचे नेतृत्व रुजू लागले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली. जिल्हा परिषदेत ते दहा वर्षे कार्यरत राहिले. तेथे त्यांनी उपाध्यक्ष, सभापती म्हणून कारकीर्द गाजवली. जिल्हा परिषदेतील त्यांचे बोलणे, त्यांचे काम याची छाप तालुक्‍यावर पडली. पन्हाळा-गगनबावडा-वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवताना जनतेने त्यांना एक मत एक रुपया देऊन त्यांना निवडून आणले. त्यानंतर राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्ष इंदिरा गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी सलग पाच वेळा आमदार होण्याचा मान मिळवला. 

अस्सल मराठमोळ्या रांगड्या भाषेतील भाषणाच्या जोरावर त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर छाप पाडली. त्यांची भाषणे ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत असे. सर्वसामान्य कार्यकर्त्यासोबत त्यांचे नाते नेहमीच घट्ट राहिले. 

प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा 
पाटील यांचा मृतदेह येथील यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयात गुरुवारी सकाळी 7 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता त्यांच्या वाड्यापासून कोडोलीतील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. दत्त मठीसमोरील पटांगणावरील त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

लोकांशी जिव्हाळ्याचे नाते - कोरे 
माजी आमदार यशवंत दादा यांनी सर्वसामान्य लोक केंद्रबिंदू ठेवून काम केले. त्यांचे लोकांशी निर्माण केलेली नाळ व जिव्हाळा मोठा होता. त्यांच्या निधनाने तालुका पोरका झाला असून त्यांच्या दुःखात मी, वारणा समूह व जनसुराज्य शक्‍ती पक्ष सहभागी आहे, अशा शब्दांत माजी मंत्री विनय कोरे यांनी श्रद्धांजली वाहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com