गड-किल्ल्यांचा आता गॅझेटियर ग्रंथ..!

गड-किल्ल्यांचा आता गॅझेटियर ग्रंथ..!

कोल्हापूर - राज्यातील गड-किल्ल्यांचे आता स्वतंत्र गॅझेट होणार असून, त्याचाच एक भाग म्हणून गॅझेटियर ग्रंथांच्या निर्मितीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्यावर भर दिला असून, विविध विभागनिहाय लेखनाची जबाबदारी तज्ज्ञांना दिली गेली. राज्य शासनाच्या गॅझेटियर विभागातर्फे हे काम हाती घेण्यात आले आहे. राज्यभरातील सुमारे ६०० गड-किल्ल्यांची माहिती यानिमित्त संकलित होईल. 

शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या गॅझेटियर विभागातर्फे राज्य गॅझेटियर ग्रंथांची निर्मिती केली जाते. एखाद्या विषयाचा अभ्यास केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता तो राज्यव्यापी करणे, हा या ग्रंथांचा उद्देश असतो. या विभागाने यापूर्वी औषधी वनस्पती, महाराष्ट्र ः भूमी आणि लोक, स्थापत्य व कला आदी विषयांवरील गॅझेटियर ग्रंथ प्रकाशित केले आहेत.  

गड-किल्ले गॅझेटियर ग्रंथाच्या माध्यमातून त्या-त्या गड-किल्ल्यांचे क्षेत्रफळ व उंची, इतिहास, भौगोलिकदृष्ट्या रचना, वैशिष्ट्ये, सांस्कृतिक, आर्थिक, संरक्षणात्मक महत्त्व, जाण्याचा मार्ग, किल्ल्यावरील वास्तू, शिल्प, शिलालेख, लेणी, मंदिरे, जलव्यवस्था, भुयारी मार्ग, प्रकाशित-अप्रकाशित संदर्भ, उपलब्ध छायाचित्रे व नकाशे आदी गोष्टींची माहिती या ग्रंथातून संकलित केली जाणार आहे. त्यामुळे अनेक दुर्लक्षित गड-किल्ल्यांचा ठेवा छायाचित्र व माहितीच्या रूपाने दुर्गप्रेमींसह अभ्यासकांना उपलब्ध होईल. एकट्या पश्‍चिम महाराष्ट्रात दीडशेहून अधिक परिचित व अपरिचित गड-किल्ले आहेत. या विभागाची जबाबदारी प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके यांच्याकडे देण्यात आली आहे. 

दुर्लक्षित गड सर्वांसमोर येणार
पश्‍चिम महाराष्ट्रातील लोहगड-विसापूरपासून सिंहगड, वासोटा, प्रतापगड, प्रचीतीगड, पन्हाळगड, पारगड, कलानिधीगड अशा गड-किल्ल्यांबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील पडसाळीच्या जंगलातील मुडागड, सांगलीतील भूपालगड, सातारा जिल्ह्यातील महिमानगड, वारूगड, संतोषगड, मधुमकरंदगड आदी दुर्लक्षित गड-किल्ल्यांचा ठेवाही यानिमित्त सर्वांसमोर येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com