ढोल-ताशांचा गजर अन्‌ शिवछत्रपतींचा जयघोष

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

कोल्हापूर - ढोल-ताशांचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकारात आज मुंबईतील शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जिल्ह्यातून गोळा केलेल्या गड-किल्ल्यांवरील माती व पाण्याच्या कलशाची शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी भवानी मंडपात या माती व पाण्याचे पूजन महापौर हसीना फरास यांच्या हस्ते व आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शनिवारी होत आहे. आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व गड आणि किल्ले, हुतात्म्यांच्या स्मारकांच्या ठिकाणची पवित्र माती आणि नद्यांचे पाणी आज सकाळी जुना राजवाडा येथील भवानी मंडपात मंत्रोच्चार आणि शाहू गर्जना पथकाच्या ढोल-ताशांच्या गजरात महापौर हसीना फरास यांच्या हस्ते पूजन होऊन मुंबईला आज समारंभपूर्वक पाठविण्यात आले. 

या वेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार सत्यजित पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, करवीरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार रणजित भोसले, तहसीलदार उत्तम दिघे, महापालिकेचे सहायक आयुक्त श्री. सचिन खाडे, भाजपचे संदीप देसाई, शिवसेनेचे विजय देवणे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, सह्याद्री प्रतिष्ठानचे हेमंत साळुंखे, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या डॉ. राजश्री चव्हाण, बजरंग दलाचे संभाजी साळुंखे, गडसंवर्धन समितीचे प्रमोद पाटील यांच्यासह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी पवित्र मातीचे कलश आणि नद्यांचे जलकलश यांचे पूजन झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात त्याची मिरवणूक शहरातून काढण्यात आली. शाहू गर्जनाचे ढोल पथक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. फुलांनी सजवलेल्या टेम्पोत हे कलश ठेवण्यात आले होते. शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर हा टेम्पो मुंबईकडे रवाना झाला.

Web Title: fort soil, water kalash rally