अन्‌ "त्यांचा' ठावठिकाण मिळाला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

शहरातील हसनापूर रस्त्यावरील हॉटेल साई छत्रपती येथे रविवारी (ता. एक) रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणातील चार आरोपींना नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज दुपारी मोबाईल लोकेशनच्या आधारे येवला (जि. नाशिक) येथून ताब्यात घेऊन लोणी पोलिसांच्या हवाली केले. 

लोणी ः शहरातील हसनापूर रस्त्यावरील हॉटेल साई छत्रपती येथे रविवारी (ता. एक) रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणातील चार आरोपींना नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज दुपारी मोबाईल लोकेशनच्या आधारे येवला (जि. नाशिक) येथून ताब्यात घेऊन लोणी पोलिसांच्या हवाली केले. 
सिराज ऊर्फ सोल्जर आयूब शेख (वय 24), संतोष सूरेश कांबळे (वय 28), गाठण ऊर्फ शाहरुख उस्मान शहा (वय 20, तिघे रा. श्रीरामपूर) व अरुण भास्कर चौधरी (वय 23, रा. लोणी), अशी त्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी सांगितले, की श्रीरामपूर येथील आशा आब्बू कुरेशी यांचा मुलगा फरदीन कुरेशी (वय 18) याला नाशिक येथे सोबत येण्यासाठी आरोपी सिराज, संतोष व शाहरुख या सर्वांनी जबरदस्ती केली. दरम्यान, लोणी येथे आब्बूचे साथीदार उमेश नागरे, अरुण चौधरी, अक्षय बनसोडे, शुभम कदम आदींशी त्यांचे भांडण झाले. त्यात गावठी पिस्तुलातून गोळीबार करून फरीद कुरेशी यांच्यावर गोळी झाडण्यात आली. घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले. 

येवल्यातून घेतले ताब्यात 
आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सूचनेनुसार पोलिसांची पथके नेमण्यात आली. त्यांतील एका पथकाने आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता, ते सर्व जण येवला परिसरात असल्याचे लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन चौघांना ताब्यात घेतले आणि लोणी पोलिसांकडे सोपविले. 

आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे 
पथकाने ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी सिराज, संतोष, शाहरुख यांच्याविरुद्ध यापूर्वीच वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सिराजविरुद्ध आठ, संतोषविरुद्ध सात आणि शाहरुखविरुद्ध चार गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

तांत्रिक तपासावरून आरोपीचा शोध 
गोळीबार करून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेणे आव्हात्मक होते. परंतु, तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांचा शोध घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले. चार जणांना अटक केली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

- दिलीप पवार, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four accused Gajaad