दगडफेकप्रकरणी दिलबहार तालमीच्या चौघांना अटक

दगडफेकप्रकरणी दिलबहार तालमीच्या चौघांना अटक

कोल्हापूर - फुटबॉल सामन्यानंतर झालेल्या दगडफेकप्रकरणी दिलबहार तालमीच्या चौघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.  पोलिसांनी सांगितले, की त्यामध्ये अनिकेत अभिजित सावंत (वय २३, रा. घर नं. ९६५, कापडी गल्ली, बी वॉर्ड, दिलबहार तालमीजवळ, रविवार पेठ), स्वप्नील विनायक माने (२५, रा. घर नं ९७८, बी वॉर्ड, जैन गल्ली, रविवार पेठ), इचीबेरी युझुची इमॅन्युअल (चिमा) (२९, नायजेरीयन नागरिक, सध्या रा. सणगर गल्ली) यांचा समावेश आहे.

दरम्यान, चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजक व बालगोपाल तालमीचे अध्यक्ष श्रीनिवास साळोखे (रा. मिरजकर तिकटी), उद्योजक चंद्रकांत जाधव (रा. सम्राटनगर), नगरसेवक संभाजी जाधव (रा. पाटाकडील तालीमजवळ मंगळवार पेठ), साऊंड सिस्टीम व्यावसायिक शिवाजी पंडे (रा. सुभराव गल्ली तालीम मंडळ जवळ), सौरभ माने (सनगर गल्ली, मंगळवार पेठ) यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. विनापरवाना ध्वनीक्षेपक लावणे तसेच आवश्‍यक परवानगी न घेणे असे त्यांच्यावरील गुन्ह्याचे स्वरूप आहे.

दिलबहार आणि पाटाकडील तालीम मंडळाच्या २० ते २५ समर्थकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात केली आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या तरुणांवर मारामारी, खुनाचा प्रयत्न, अश्‍लील हावभाव करणे आदी कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी सांगितले, की शाहू स्टेडियमवर काल सामन्यानंतर झालेल्या दगडफेक प्रकरणी दिलबहार तालीम मंडळाचे आशिष जमदाडे, नीलेश जाधव, धनाजी सूर्यवंशी, शशांक माने, अक्षय फाळके, शैलेश माने, महेश पाटील, अजय शिराळे, बंटी कावणेकर, धीरज बालगुडे यांच्यासह १० ते १५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पाटाकडील तालमीकडीलही १० ते १५ जणांवर गुन्हे दाखल केले असून त्यांचा शोध सुरू आहे. 

चिमाकडून चिथावणी
पोलिसांनी सांगितले, की दगडफेक सुरू असताना दिलबहारचा खेळाडू चिमा याने आपल्या समर्थकांना ‘किल देम, किल देम’ अशी चिथावणी दिली. त्यावरून त्यांच्या समर्थकांनी प्रेक्षकांसह बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलिसांवरही दगडफेक केली. त्यामुळे चिमावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मंगळवार पेठ बनली पोलिस छावणी
दगडफेकप्रकरणी संशयितांचा शोध घेण्यासाठी मंगळवार पेठेत कोपऱ्या कोपऱ्यावर पोलिस तैनात केले होते. ते वाहनांची तपासणी करत होते. काही घरांमध्ये जावूनही त्यांनी चौकशी केली. दिवसभर येथे पोलिसांचा वावर होता. त्यामुळे मंगळवार पेठेला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. शाहू स्टेडियम आणि परिसरात दुसऱ्या दिवशीही बंदोबस्त होता. 

पोलिसास जीवे मारण्याचा प्रयत्न 
पोलिसांनी सांगितले, की दगडफेकीमध्ये पोलिस कर्मचारी विकास शंकर हिबाळे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. कमलेश भगवानभाई माराडिया (रा. रुईकर कॉलनी), विशाल सुनील जाधव (आझाद गल्ली, बिंदू चौक) यांनाही मारहाण झाली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com