जागा खाली करण्यासाठी ३० लाखांची सुपारी

जागा खाली करण्यासाठी ३० लाखांची सुपारी

कोल्हापूर - आयर्विन ख्रिश्‍चन हॉस्टेल कंपाउंडमधील जागा खाली करून देण्यासाठी ३० लाखांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार राजारामपुरी पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी आणखी चौघांना अटक केली आहे. यात जेसीबी चालकाचाही समावेश आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला जेसीबीही जप्त केला. हल्ल्यातील मुख्य संशयित गणेश बुचडे हा कुटुंबासह पसार झाला असून, त्याचा शोध सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांनी सांगितले. 

सूरज तानाजी नलवडे (वय २८, रा. शाहूनगर), रोहन सुरेश साळोखे (३०, रा. बागल चौक), अमोल रघुनाथ पाटील (३५, रा. यादवनगर) आणि जेसीबी चालक विनोदकुमार शामलाल जैस्वाल (३२, रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - कोटीतीर्थ मार्केटसमोरील आयर्विन ख्रिचन हॉस्टेल कंपाउंडमधील घरांवर २५ एप्रिलला भरदिवसा १०० ते १५० जणांच्या जमावाने हल्ला केला. यात हल्लेखोरांनी जेसीबीचाही वापर केला. हल्ल्यात सहा जण जखमी झाले होते. या प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात संशयित सुनील शेळके, किशोर कलकुटगीसह त्याच्या १६ साथीदारांसह जमावावर गुन्हा दाखल केला. त्यातील संशयित राहुल कवाळे, किशोर कलकुटकी, धनंजय गड्यावर, सचिन दुर्वे, इम्रान पठाण, पिंटू सातपुते यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने सात दिवसांची कोठडी सुनावली. 
शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांनी तपास सुरू केला.

संशयित कलकुटकीने आयर्विन कंपाउंडची जागा घेतली. त्याने संशयित धनंजय गड्‌यावरच्या मदतीने संशयित सचिन दुर्वेला हाताशी धरले. ही जागा खाली करण्यासाठी त्याला ३० लाखांची सुपारी दिली. त्यातील १० लाखांचा ॲडव्हान्सही त्याला दिला. त्याने ही रक्‍कम संशयित गणेश बुचडे (रा. राजारामपुरी) याला जागा खाली करून देण्यास दिली. गुरुवारी (ता. २५) जेसीबी, साथीदार व महिलांसह घरांवर हल्ला केल्याची कबुली अटक केलेल्या संशयितांनी दिली.

त्यानुसार रवींद्र कदम यांनी संशयितांचा शोध सुरू केला. काल सायंकाळी सूरज, रोहन, अमोल हे संशयित शहराबाहेर जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक येथे येणार असल्याची माहिती कदम यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून त्या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या पाच हॉकी स्टीकही जप्त केल्या.

दरम्यान, गगनबावडा येथून जेसीबी चालक संशयित विनोदकुमारलाही अटक केली. त्याच्याकडून सात लाखांचा जेसीबीही जप्त केला. संशयित सूरजवर खुनाच्या प्रयत्नासह पाच गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आल्याचेही कदम यांनी सांगितले. 

संशयित गणेश बुचडे फरारी  
गुन्हा घडल्यापासून संशयित गणेश बुचडे हा कुटुंबासह फरारी झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. तो एका माजी नगरसेवकाचाही नातेवाईक असल्याची माहिती पुढे आली. त्याने यापूर्वीही असे प्रकार केले आहेत का, याचाही तपास सुरू असल्याचे कदम यांनी सांगितले. 

जानेवारीत राजारामपुरी आठव्या गल्लीतील एका घराचे कंपाउंड जेसीबीने फोडून ते खाली करण्याचा प्रयत्न झाला होता. या गुन्ह्यात प्राप्त झालेल्या सीसीटीव्हीत अटक केलेले संशयितही आढळून आले आहेत. 
- रवींद्र कदम,
सहायक पोलिस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com