सांबरशिंगाची तस्करी उघड; चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

सव्वा अकरा वाजता मोटार (MH 09 DX 302) ढाब्यासमोर आली असता पोलिसांनी अडवली. आत चौघे होते. त्यांना उतरवून तपासणी केल्यानंतर डिकीतील एका पोत्यात सांबराचे शिंग आढळले. त्याबाबत विचारल्यानंतर पुणे येथे विक्रीसाठी जात असल्याची माहिती दिली.

सांगली पोलिसांची कामगिरी : चार लाखांच्या शिंगासह मोटार जप्त

सांगली : सांबर हरिणाच्या शिंगाची तस्करी करून ते पुणे येथे विक्रीसाठी निघालेल्या कृष्णा शित्ताजी मोहिते (वय 26, कसबे डिग्रज, ता. मिरज), अतुल बाबासाहेब कल्याणी (वय 36, रूकडी, ता. हातकणंगले), महेश मोहन राव (वय 26, अभिनंदन कॉलनी, शिंदे मळा, सांगली), चंद्रकांत बाबासाहेब कांबळे (वय 25, नेज, ता. हातकणंगले) या चौघांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली. सांगलीवाडीतील यश ढाब्यासमोर कारवाईत चार लाख रुपये किमतीचे सांबरशिंग, पाच मोबाईल, मोटार, चाकू असा 13 लाख 35 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

अधिक माहिती अशी, की गुरूवारी रात्री कृष्णा मोहिते हा सांबराचे शिंग विक्रीसाठी सांगलीवाडी येथील यश ढाब्यासमोर येणार असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक युवराज कामटे यांना मिळाली. निरीक्षक अनिल गुजर यांना त्यांनी माहिती दिली. खात्री करण्यासाठी रात्री अकरा वाजता ढाब्याजवळ सापळा रचला. सव्वा अकरा वाजता मोटार (MH 09 DX 302) ढाब्यासमोर आली असता पोलिसांनी अडवली. आत चौघे होते. त्यांना उतरवून तपासणी केल्यानंतर डिकीतील एका पोत्यात सांबराचे शिंग आढळले. त्याबाबत विचारल्यानंतर पुणे येथे विक्रीसाठी जात असल्याची माहिती दिली. चौघांना ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याकडील शिंग, पाच मोबाईल, मोटार, चाकू असा 13 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. चौघांविरूद्ध वन्यजीव अधिनियम 1972 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, उपाधीक्षक डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गुजर, उपनिरीक्षक कामटे, उपनिरीक्षक रोहित चौधरी, उपनिरीक्षक जयदीप दळवी, कर्मचारी अनिल लाड, अमोल क्षीरसागर, सुशांत ठोंबरे, प्रकाश चौगुले यांनी कारवाई केली.

Web Title: four arrested for smuggling of sambar deer horn