प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत चौघा मित्रांची उत्तुंग भरारी... 

solapur
solapur

सोलापूर ः अतिशय प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक चणचण आणि विद्यार्थिदशेतच कुटुंबाची पडलेली जबाबदारी.. अशा एक ना अनेक आव्हानांना समर्थपणे तोंड देत दयानंद वाणिज्य महाविद्यालयात शिकणाऱ्या चौघा मित्रांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. सर्व सुखसोई असतानाही अपयशी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर या चौघांचे यश आदर्शवत आहे. परिस्थिती काहीही असली तरी न डगमगता त्यावर मात केली पाहिजे, असाच संदेश त्यांनी दिला आहे. 

धनराजसिंग शिकलगार 
वडील रूपसिंग शिकलगार यांचा वेल्डिंगचा परंपरागत व्यवसाय. वडिलांना कामात मदत करण्यासह एका महा ई-सेवा केंद्रावर महाविद्यालयाच्या वेळेनंतर काम करायचे. त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून घरखर्चासह शिक्षणाचा खर्च भागवायचा, हा दिनक्रम होता धनराज शिकलगार याचा. वाणिज्य विभागात 55 टक्के गुण मिळवून त्याने आपले ध्येय निश्‍चित केले आहे. तो एक उत्तम हॉकीपटू असून, त्याला पोलिस अधिकारी व्हायचे आहे. 

सुशांत नारायणकर 
वडील बाळू नारायणकर महापालिका उद्यान विभागात काम करीत होते. काही वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर सुशांतवर घरची जबाबदारी पडली. त्यामुळे महाविद्यालय सुटल्यावर कापड दुकानात सेल्समन म्हणून काम करायचे आणि सायंकाळी खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या कंपनीत संगणकचालक म्हणून रुजू व्हायचं. अतिशय प्रतिकूल स्थितीत सुशांतनेही 54 टक्के गुण मिळवले. अनुकंपा तत्त्वाखाली नोकरीसाठीचा अर्ज गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत प्रलंबित आहे. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे त्याने सांगितले. 

विशाल स्वामी 
शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी विद्यार्थिदशेपासूनच विशाल स्वामी याने पूजापाठ करून उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे पालकांवर पडणारा शिक्षणाच्या खर्चाचा बोजा कमी झाला. पूजा असलेल्या दिवशी महाविद्यालयाला सुटी घ्यावी लागली. मात्र स्वतः कमाई केलेल्या पैशातून स्वतःचे शिक्षण घेत असल्याचा अभिमान वाटतो, असे 61 टक्के गुण मिळवलेल्या विशालचे मत आहे. 

बसवराज पाटील 
कापडाच्या दुकानात काम करणारे वडील गुरुसिद्धप्पा पाटील अंथरुणाला खिळून आहेत. आई शिवणकाम करते. प्रपंच चालविण्यासाठी आईला मदत करण्याची जबाबदारी बसवराजवर पडली. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेऊन तो चरितार्थ चालवत आहे. कोणत्याही प्रकारची शिकवणी न लावता 64 टक्के गुण मिळवलेल्या बसवराजला भविष्यात स्टेनोग्राफर व्हायचे आहे. 

प्रतिकूल परिस्थितीवर अतिशय चिकाटीने तसेच जबाबदारी ओळखून मात करीत या चौघा मित्रांनी उत्तम यश मिळवले आहे. गरज पडेल ती मदत मी त्यांना करतो. भविष्यातही त्यांच्या शिक्षणासाठी आवश्‍यक मदत करणार आहे. 
- बाळासाहेब आळसंदे, सदस्य महापालिका परिवहन समिती, सोलापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com