राधानगरीत चार बंदूका, दारुगोळा जप्त 

राजेश मोरे
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी वापरल्या जाणाऱ्या चार बंदुकांसह दारुगोळाही जप्त केला. 

कोल्हापूर - अपटाळ (ता. राधानगरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून शिकारीसह दहशतीसाठी वापरल्या जाणाऱ्या चार बंदुकांसह दारुगोळाही जप्त केला. 

अटक केलेल्या संशयितांची नांवे - कृष्णात गणपती पाटील (वय 49), शिवाजी बाळू जोशी (वय 38), नाना पांडुरंग पाटील (वय 42), संजय तुकाराम पाटील (वय 38, सर्व रा. आपटाळ, ता. राधानगरी) अशी आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, मुंबईनजिकच्या नालासोपारा येथून 10 ऑगस्टला एटीएसने छापा टाकून 20 गावठी बॉंबसह, जिलेटिनच्या दोन कांड्या, 22 नॉन इलेक्‍ट्रनिक डिटोनेटर्स, विषाच्या दोन बाटल्यासह बॉम्ब बनविण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी अटक केलेल्या तिघांची राज्यातील प्रमुख महानगरामध्ये घातपात घडविण्याची तयारी होती असे पोलिसांच्या तपासात पुढे आले होते. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील पोलिस यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अवैध शस्त्रसाठा केलेल्यांचा शोध सुरू होता. 

असा झाला तपास 
आपटाळ (ता. राधानगरी) येथे कृष्णात पाटील याच्याकडे बंदूक आहे. गेल्या वर्षभरात दोन राजकीय वादात त्याने ही बंदूक काढून दहशत माजवली होती. त्याचबरोबर या गावात अशाच प्रकारच्या बंदुका असल्याची माहिती पोलिस हवालदार प्रल्हाद देसाई व नरसिंग कांबळे यांना मिळाली. त्यांनी याची माहिती पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना दिली. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक सचिन पंडित यांना त्या गावात छापा टाकण्यास सांगितले. त्यानुसार पंडित यांनी देसाई, कांबळेंसह इक्‍बाल महात, श्रीकांत मोहिते, प्रकाश संकपाळ आदींसह या गावात छापा टाकला. त्यात त्यावेळी त्यांना कृष्णांत पाटील, शिवाजी जोशी, नाना पाटील, संजय पाटील या चौघांच्या घरी त्यांना चार बंदूका, ठेचणीच्या बंदूकीमेध्य वापरण्यात येणारी दारू, छरे आणि एक जिवंत काडतूस असे 45 हजार 320 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. प्राथमिक तपासात ते शिकारीसाठी आणि दहशतीसाठी या बंदूकीचा वापर करत असल्याची माहिती पुढे येत असल्याचे निरीक्षक सावंत यांनी सांगितले. 

बंदूक बनविणाऱ्याचा शोध सुरू -
जप्त केलेल्या बंदूका संशयितांनी कोणाकडून खरेदी केल्या. त्याची माहिती घेतली जात आहे. त्यातून एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्‍यता तानाजी सावंत यांनी वर्तवली आहे. 

बेकादेशीर शस्त्रे बाळगणे, बेकायदेशीर शिकार करणे हे गंभीर गुन्हे आहेत. असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल

- तानाजी सावंत (पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा) 
 

Web Title: Four guns, ammunition seized in Radhanagari