फुले जनआरोग्य योजना: कोल्हापुरातील चार रुग्णालये बडतर्फ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर - सर्वसामान्यांसाठी वरदान ठरणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत रुग्णांकडून पैसे व योजनेतूनही पैसे घेण्याचा दुहेरी लाभ उठविला गेला, अशा तक्रारी असलेल्या राज्यभरातील तीनशेवर रुग्णालयांवर पंधरा दिवसांत योजनेच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते. यातील २२४ रुग्णालयांवर कारवाई होणार आहे. यात कोल्हापुरातील चार रुग्णालये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून बडतर्फे केली आहेत;

कोल्हापूर - सर्वसामान्यांसाठी वरदान ठरणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत रुग्णांकडून पैसे व योजनेतूनही पैसे घेण्याचा दुहेरी लाभ उठविला गेला, अशा तक्रारी असलेल्या राज्यभरातील तीनशेवर रुग्णालयांवर पंधरा दिवसांत योजनेच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते. यातील २२४ रुग्णालयांवर कारवाई होणार आहे. यात कोल्हापुरातील चार रुग्णालये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून बडतर्फे केली आहेत; तर ११ रुग्णालयांवर निलंबनाची कारवाई होणार आहे, अशी माहिती योजनेच्या अधिकृत सूत्रांनी दिली.

आयुष्यमान भारत योजनेंतर्गत मोफत उपचाराची सुविधा म्हणून महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जाते. त्यासाठी राज्य शासनाने पाचशे कोटींची तरतूद केली आहे. या योजनेचे मुंबईतील व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुधाकर शिंदे व त्यांच्या २० सहकाऱ्यांनी आठवडाभर २० सहकाऱ्यांच्या मदतीने कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील ६८ रुग्णालयांवर छापे टाकल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून सर्वसामान्य रुग्ण व जखमींसाठी मोफत उपचार होतात. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी व शासकीय रुग्णालय या योजनेत समाविष्ट आहेत. योजनेत कोल्हापुरात ३६ रुग्णालये आहेत, यापैकी ३३ रुग्णालंयावर चार दिवसांपूर्वी छापे टाकले आहेत. असे छापे राज्यभरातील या योजनेत समाविष्ट असलेल्या बहुतांश रुग्णालयावरही पडले होते. त्यात गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळलेली रुग्णालये योजनेतून वगळली तर नियमित त्रुटी आढळलेल्या काही रुग्णालयांवर निलंबनाची कारवाई होणार आहे. यात रुग्णालयांनी कोल्हापुरातील ४ तर सांगलीतील ५ रुग्णालयांना योजनेतून बडतर्फे केले आहे. कोल्हापुरातील ११ तर रत्नागिरी व सिंधुदुर्गातील प्रत्येकी एक रुग्णालय निलंबित होणार आहेत.

दरम्यान विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही  कोल्हापुरात एक पथक पाच रुग्‍णालयांची तपासणी करीत आहे. रुग्णांची फसवणूक कशा प्रकारे झाली याचाही शोध घेतला जात आहे. त्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे जबाबही घेतले जात आहेत. 

कोल्हापूर शहरातील तीन रुग्णालयात ही योजना मोफत असूनही जादा पैसे उकळल्याचे छाप्यादरम्यान उघडकीस आले, तेव्हा ते पैसे जागेवर परत देण्याचे आदेश योजनेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्यांना दिलासा मिळाला असून ज्यांची फसवणूक झाली अशांना तक्रारीसाठी पुढे येण्याची वाट खुली झाली आहे.   
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, जिल्ह्यातील ६८ खासगी व शासकीय रुग्णालयात ही योजना आहे. तेथे छापे टाकले होते. यात योजनेच्या अंमलबजावणीत तक्रारी होत्या. त्याचीही दखल घेतली जात आहे.

बडतर्फ रुग्णालये
सिटी हॉस्पिटल, अर्थोपेडिक सेंटर, संजीवनी हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल

निलंबित रुग्णालये 
आनंद नर्सिंग होम, ॲस्टर आधार, गणेश हॉस्पिटल, जया युरॉलॉजी हॉस्पिटल, महालक्ष्मी हृदयालय, मोरया हॉस्पिटल, पट्टणशेट्टी हॉस्पिटल, सुश्रुषा हॉस्पिटल, पायस हॉस्पिटल (जयसिंगपूर), रामकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट (राधानगरी) व बसर्गे हॉस्पिटल (गडहिंग्लज).

...तर निलंबन मागे शक्‍य?
ज्या रुग्णालयांवर निलंबन कारवाई झाली, अशा रुग्णालयांकडून लेखी खुलासा मागविला जाणार आहे. तसेच त्रुटी दूर करण्याबाबतची हमी घेतली जाणार आहे. या दोन्ही बाबी समाधानकारक असल्यास निलंबन मागे घेण्याबाबत तसेच या रुग्णालयांचा पुन्हा योजनेत समावेश करण्याबाबत राज्यस्तरावर विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: four hospitals in Kolhapur debar from Mahatma Phule health scheme

टॅग्स