पाच दिवसांत बदलल्या चारशे कोटींच्या नोटा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

सातारा - पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर नागरिकांनी या नोटा बॅंकेत जमा करण्यास सुरवात केली. गेल्या पाच दिवसांत जिल्ह्यातील विविध बॅंकांत सुमारे चारशे कोटी रुपये जमा झाल्याचे संपर्क सूत्रांनी सांगितले. आज पाचव्या दिवशीही बॅंकांत जुन्या नोटा जमा करण्याबरोबरच नवीन व शंभर रुपयांच्या नोटा काढण्यासाठी गर्दी होती. एटीएमलाही दिवसभर रांगा होत्या; पण तेथीलही पैसे संपल्याने नागरिकांची निराशा झाली.

कालच्या सुटीनंतर बॅंकांचे कामकाज आज पुन्हा सुरू झाले. सकाळपासूनच बॅंकांच्या दारात जुन्या नोटा जमा करण्यासाठी, तसेच पैसे काढण्यासाठी गर्दी झाली होती. दिवसभर सर्वच बॅंकांत ग्राहकांच्या रांगा होत्या. काही एटीएम मशिनमधील पैसे दुपारीच संपले, तर स्टेट बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत रांगा होत्या. पुरेशा पैशांअभावी सर्वच एटीएम सायंकाळी बंद होती. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. उद्यापासून (बुधवार) सर्व बॅंकांत पुरेसे पैसे उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. सहकारी बॅंकांची एटीएम आज बंद होती. जिल्हा बॅंकेत पाचशे व हजारांच्या नोटा स्वीकारण्यास निर्बंध आल्याने या बॅंकेच्या ग्राहकांनी राष्ट्रीयीकृत बॅंकांत पैसे भरण्यास व पैसे काढण्यास गर्दी केली. विशेषतः ग्रामीण भागातील ग्राहकांचे त्यामुळे हाल झाले. ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या शाखेत पैसे काढण्यासाठीही ग्राहकांच्या रांगा होत्या. अकरा ते 15 नोव्हेंबरअखेर जिल्ह्यातील बॅंकांत साधारण सुमारे 400 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्याचे सांगण्यात येत होते. महाराष्ट्र बॅंकेकडे 60 ते 70 कोटी रुपये जमा झाल्याचे सांगितले जात होते. नवीन नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने बॅंकांत गर्दी वाढतच आहे. त्याचा ताण बाजारपेठेवर आला असून, बाजारपेठेतील व्यवहारावर परिणाम झाल्याचे चित्र होते.

Web Title: Four hundred million notes changed in five days