चार हजार किलोमीटरचा प्रवास ९८ तासांत!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

विनया केत यांचा विक्रम; पुरुष गटातील विक्रम ९६ तासांचा

विनया केत यांचा विक्रम; पुरुष गटातील विक्रम ९६ तासांचा
पुसेगाव - पर्यावरण संवर्धन व महिला सबलीकरणास प्रेरणा मिळावी, यासाठी साध्या मोटारकारने लेह ते कन्याकुमारी हा चार हजार किलोमीटर अंतराचा अनोळखी मार्गावरील प्रवास केवळ ९८ तासांत पूर्ण करण्याचा विक्रम येथील माहेरवाशीण असलेल्या सौ. विनया श्रीकांत केत यांनी केला आहे. या अंतरासाठी आजवरचा पुरुष गटातील विक्रम ९६ तासांचा आहे. या विक्रमाबद्दल सौ. विनया यांचा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषदेच्या महिला, बालकल्याण समितीच्या सभापती वैशाली फडतरे, सतीश फडतरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुसेगाव येथील रहिवासी विश्वास फडतरे यांची विनया ही कन्या असून सहा वर्षांपूर्वी सोलापूर येथील श्रीकांत केत यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सध्या त्या पुणे येथे नोकरीस असून त्यांना पाच वर्षांची मुलगी आहे. पर्यटन व भ्रमंतीची आवड असणाऱ्या विनया यांनी भारतभ्रमण करण्याचा निर्णय घेतला व त्यास पती श्रीकांत यांचे पाठबळ मिळाले. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी पुणे ते लडाख या दुर्गम भागातील मोहीम हाती घेतली. एकटीने प्रवास करताना अनेकदा त्यांना दिवसा व रात्रीही प्रवास करावा लागला. मोहिमेसाठी स्पोर्टस कारची आवश्‍यकता असताना त्यांनी साधी कार (मारुती रिट्‌झ) वापरून आपले ध्येय साध्य केले. या अंतरासाठी आतापर्यंतचा पुरुष गटातील विक्रम ९६ तासांचा आहे. परंतु, विनया यांनी पुरुष गटाशी स्पर्धात्मक असा ९८ तास ५५ मिनिटे असा विक्रम नोंदविताना एकाच दिवसात एक हजार २७५ किलोमीटर ड्रायव्हिंग करण्याचाही विक्रम नोंदविला आहे. २५ जून २०१६ मध्ये आरंभ केलेली ही मोहीम त्यांनी २९ जून २०१६ रोजी पूर्ण केली. जयश्री पॉलिमर्स, रॉयल्स आय आणि वंडर कार्स यांनी प्रायोजित केलेल्या या मोहिमेचे आयोजन पुणे येथील संस्कृती प्रकाशनने केले. पती श्रीकांत यांचे पाठबळ व कुटुंबीयांची साथ मिळाल्यानेच आपण हे यश मिळवू शकलो, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या सागर (मध्यप्रदेश) ते अनंतपूर (आंध्रप्रदेश) या मोहिमेची नोंदणी पूर्ण रुटवर रेकॉर्डिंग व त्याची नोंद आहे.

Web Title: Four thousand kilometers traveled 9 8 hours!