"चार गाव जलयुक्त शिवार' 

रूपेश कदम
सोमवार, 30 एप्रिल 2018

मलवडी - "गाव करील ते राव काय करील' असं म्हटलं जातं. मग, चार गावे जर एकत्रित आली तर बदल हा नक्कीच होणार. जलयुक्त शिवार अभियानात महाराष्ट्राला नवीन दिशा देणारा प्रकल्प म्हणजेच "चार गाव जलयुक्त शिवार.' 

मलवडी - "गाव करील ते राव काय करील' असं म्हटलं जातं. मग, चार गावे जर एकत्रित आली तर बदल हा नक्कीच होणार. जलयुक्त शिवार अभियानात महाराष्ट्राला नवीन दिशा देणारा प्रकल्प म्हणजेच "चार गाव जलयुक्त शिवार.' 

माणच्या पश्‍चिम हद्दीवरील दुष्काळी गावे म्हणून पांढरवाडी, कोळेवाडी, गोडसेवाडी व दिवडी यांची ओळख. हंडाभर पाण्यासाठी टॅंकरची वाट पाहणे हे नेहमीचे. मग, शेतीसाठी पाणी कुठून उपलब्ध होणार? शासनाचे जलयुक्त शिवार अभियान सुरू झाले. पण, पहिल्या वर्षी या चार गावांचा या योजनेत समावेश नव्हता. तरी स्वबळावर गावात बदल घडवूया, असा निश्‍चय या गावांमधील तसेच मुंबईकर मंडळींनी केला. पांढरवाडीचे सुपुत्र व "सकाळ इन्हेस्टिगेशन टीम'चे ब्युरो चिफ तुषार खरात यांनी आप्पासाहेब कदम व सुभाष घाडगे यांना सोबत घेत कृती आराखडा तयार केला. लोकवर्गणीतून गोडसेवाडी व कोळेवाडी येथे डोंगर उताराला खोल सलग समतल चर पोकलेनच्या साह्याने काढले. हे काम झाल्यानंतर आठच दिवसांत गोडसेवाडीच्या डोंगरावर चांगला पाऊस झाला. काही दिवसांतच या परिसरातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या. या पाण्यावर वाटाण्याचे लाखो रुपयांचे उत्पन्न इथल्या शेतकऱ्यांनी घेतले. यामुळे ग्रामस्थांना काम करण्यास हुरूप आला. 

चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी ग्रामस्थांची एकजूट पाहून एक महिना पोकलेन मशिन दिल्यामुळे ग्रामस्थांना बळ मिळाले. मशिनच्या साह्याने खोल सलग समतल चर काढण्यात आले. जुन्या माती नालाबांधांमधील गाळ काढून त्यांची दुरुस्ती करण्यात आली. जलयुक्त शिवारमध्ये नसतानाही लोकसहभागातून सुरू असलेली कामे पाहून तत्कालीन जिल्हाधिकारी आश्विन मुद्‌गल यांनी सहकार्याचा हात पुढे केला. कृषी पर्यवेक्षक डी. एल. मोहिते यांचे मोलाचे सहकार्य ग्रामस्थांना मिळाले. जलसंधारणाच्या कामांबरोबर तब्बल 20 पेक्षा जास्त सिमेंट बंधारे बांधले गेले. चांगला पाऊस झाल्यामुळे या चार गावांचा संपूर्ण पाणलोट पाणीदार झाला. या गावांमधून टॅंकर हद्दपार झाला तर शिवारे हिरव्यागार पिकांनी बहरली. 

तनिष्का व्यासपीठाचेही योगदान  
"सकाळ माध्यम समूहा'च्या तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून सकाळ रिलीफ फंडातून येथील ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरणही करण्यात आले. 

Web Title: Four villages jalyukt shivar in malvadi