दुधाच्या फॅटमध्येही हेराफेरी

दुधाच्या फॅटमध्येही हेराफेरी

कुडित्रे -‘गोकुळ’साठी जिल्ह्यातील चार हजारपैकी सुमारे ४०० दूध संस्थांत उच्च प्रतीचे दूध संकलन होते. फॅट व एसएनएफ (सॉलिड नॉट फॅट) दहा लागणारे उत्पादकांचे दूध आहे. संस्था संगणकीकृत झाल्या. मात्र, फॅट काढण्यासाठी जुनाट डिग्री मशिनचा (लॅक्‍टोमीटर) सर्रास वापर केला जातो. काही इको मशिनवर म्हैस एसएनएफ नऊ, तर गाय ८.५ वर बंद केले जात आल्याचा आरोप होत आहे. यात दूध उत्पादकांची संस्थांकडून प्रतिलिटर ५५ पैशांची लूट होत आहे. रोज सुमारे दहा लाखांचे नुकसान होत आहे. दुधाच्या फॅटमध्ये हेराफेरी केली जात आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी म्हणून ‘गोकुळ’कडे पाहिले जाते. जिल्ह्यात चार हजारांपेक्षा जास्त दूध संस्था आहेत. यात सुमारे ४०० संस्थांमध्ये दहा एसएनएफ म्हणजे उच्च प्रतीचे दूध संकलन होते. सहा वर्षांपूर्वी फॅट व एसएनएफ मोजण्यासाठी आधुनिक इको मशिन सुरू झाले. आजही बहुतांश संस्थांत जुनाट डिग्री, फॅटो मशिनवर उच्च प्रतीच्या दुधाच्या सूत्रानुसार एसएनएफ काढले जाते. ही पद्धत चुकीची असून, यात गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३०, तर म्हशीच्या दुधाला ५५ पैसे असे उत्पादकांचे नुकसान होते. असे उच्च प्रतीचे सुमारे दहा लाख लिटर दूध धरल्यास दूध उत्पादकांचे रोज सहा ते सात लाखांचे मोठे नुकसान होते.

काही संस्थांत फॅट व एसएनएफ काढण्यासाठी स्टरर यंत्राचा वापर केला जातो. यात दुधावरील बुडबुडे फोडले जातात व प्रत्यक्ष दूध एसएनएफसाठी पुढे जाते. पाच ते दहाच्या आत स्टरर लावले जाते. यामुळे दुधातील बुडबुडे फुटत नाहीत. परिणामी, पुढच्या यंत्रात एसएनएफ कमी लागतो. काही ठिकाणी म्हशीचे नऊवर, तर गाईचे ८.५ वर एसएनएएफ बंद केला जातो. काही संस्थांत पावती देत नाहीत. हा प्रकार थांबणार कधी आणि उत्पादकांना प्रतीनुसार दर मिळणार कधी, असा प्रश्‍न दूध उत्पादकांतून विचारला जात आहे.

काय घडते?

  •  फॅटचे जुनाट मशिन
  •  काही संस्थांकडून लिटरला ५५ पैशांची लूट 
  •  रोज सुमारे सहा ते दहा लाखांचे नुकसान
  •  ‘गोकुळ’चे दूध संस्थांवर नियंत्रण नाही

कितीही अद्ययावत तंत्रज्ञान आले, आधुनिक तंत्रज्ञान वापरले तरी हातचलाखी करून शेतकऱ्यांना लुबाडले जाते. अशामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाच्या दामाची लूट होते.
- विष्णू राऊत
, दूध संस्थेचे सचिव

दूध संस्था भरमसाट वाढल्या आहेत. नियंत्रण ठेवणे अवघड आहे. एसएनएफ व दुधाचे फॅट मारणाऱ्या फारशा संस्था नसतील; पण एखादी संस्था असेल, तर कारवाई केली जाईल.
- विश्‍वास पाटील,
अध्यक्ष, ‘गोकुळ’
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com