मुंबईच्या भामट्याने नाशिकच्या टुरचालकाला घातला लाखोंना गंडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

नाशिक : भुजबळ फार्म परिसरात 'टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स'चा व्यवसाय करणाऱ्यास मुंबईतील भामट्‌याने परदेशी विमानाचे तिकीटांचे बुकिंग करून देण्याच्या बहाण्याने तब्बल 10 लाख रुपयांना गंडा घातला आहे. वडिवेलन मदी मंत्री (37, रा. एफ 304, सतलज रेसीडेन्सी, महालक्ष्मी मॉलच्या जवळ, सेक्‍टर 35, कामोठे, पनवेल) असे संशयिताचे नाव आहे. 

नाशिक : भुजबळ फार्म परिसरात 'टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स'चा व्यवसाय करणाऱ्यास मुंबईतील भामट्‌याने परदेशी विमानाचे तिकीटांचे बुकिंग करून देण्याच्या बहाण्याने तब्बल 10 लाख रुपयांना गंडा घातला आहे. वडिवेलन मदी मंत्री (37, रा. एफ 304, सतलज रेसीडेन्सी, महालक्ष्मी मॉलच्या जवळ, सेक्‍टर 35, कामोठे, पनवेल) असे संशयिताचे नाव आहे. 

दीपक दिनकर भोगे (रा. गणेश चौक, सिडको, नाशिक) यांचा विजय सानप यांच्याशी भागीदारीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून 'टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स'चा व्यवसाय आहे. याच माध्यमातून 'हॉटेल्स बुकिंग', 'लोकल टुरिझम टूर्स ऍरेंज' करणे, विमान तिकीटे काढून देणे आदी स्वरुपाचे काम केले जाते. परदेशी 'टूर्स'चे आयोजन करण्यासाठी मित्र ओंकार नागरे याच्या माहितीतून संशयित वडिवेलन मंदी मंत्री यांच्याशी ओळख झाली होती. याच संशयिताच्या माध्यमातून दीपक भोगे यांनी दोन वेळा थायलंड व दुबईची विमानाची तिकीटे बुकिंग करून दिली होती.

संशयित मंत्री हा 'तन्वीज हॉलिडेज्‌' ('एलफिन्स्टन्स' स्टेशन, पश्‍चिम मुंबई) येथे 'एजंट' म्हणून काम करीत असल्याचे सांगितले होते. फेब्रुवारी 2018 मध्ये संशयिताच्या ऑफिसात भेटही घेतली होती. त्यामुळे विश्‍वास निर्माण झाल्याने गेल्या 5 ऑक्‍टोबरला संशयितास मेल करून युरोप टुर्ससाठी 11 नोव्हेंबरच्या विमान तिकिटांसाठी बुकिंग केले. त्यासाठी एचडीएफसीच्या म्हसरूळ शाखेतून संशयित मंत्रीच्या कॅनरा बॅंक खात्यावर 3 लाख 87 हजार 600 रुपये व 10 ऑक्‍टोबरला 2 लाख 66 हजार असे  6 लाख 53 हजार 600 रुपये 'आरटीजीएस'द्वारे 'ट्रान्सफर' केले. त्यानंतर बॅंकॉक टूर्ससाठी 10 व्यक्तींच्या टूर्सकरिता विमानांची तिकिटे बुकिंग करण्यासाठी 19 ऑक्‍टोबरला 1 लाख 50 हजार व 50 हजार रुपये असे 2 लाख रुपये ट्रान्सफर केले. 10 ऑक्‍टोबरला 2 लाख 7 हजार रुपये ट्रान्सफर केले. असे 10 लाख 60 हजार 600 रुपये विमान तिकिटांसाठी दिले.

प्रत्यक्षात संशयित मंत्री यांनी विमान तिकिटांची बुकिंग न करता आज-उद्या करीत  भोगे यांची दिशाभूल केली. पैसे परत मागितले असता त्यासही संशयिताने टाळाटाळ केली. तसेच, भोगे हे स्वत: संशयिताच्या कार्यालयात गेले असता, संशयित मंत्री याने सहा महिन्यांपूर्वीच कंपनी सोडून दिल्याचे समजले. त्यावरून संशयिताने फसवणूक केल्याचे समोर आले. त्यामुळे याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार अर्ज दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fraud with Nashik based tour operator for lakhs of rupees