भामट्याकडून कोटींची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

नो सर...
संशयित भामटा ॲथोनी ओमानिया ऊर्फ मुथाय इसाह याची पोलिसांनी इंग्रजी भाषेत चौकशी सुरू केली. त्याला तो प्रतिसाद देत होता. मात्र, त्याची पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना शंका आली. त्यांनी त्याला 'मराठी कळते का?' असा प्रश्‍न केला. त्यावर त्याने ‘नो सर’ असे उत्तर दिले. यावरून त्याला मराठी समजते हे सत्य पुढे आले.

कोल्हापूर - हातचलाखीद्वारे परदेशी चलन भारतीय चलनामध्ये रूपांतरित करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित भामट्याने सांगली, विटा परिसरातील नागरिकांना कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला. त्याने बनावट पासपोर्ट व बनावट नाव परिधान करून हे कृत्य केले. तो केनियन नसून नायजेरियाचा असल्याचेही तपासात पुढे आल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले. 

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने काल (ता. ४) मुथाय इसाह या संशयितास अटक केली. त्याने इचलकरंजीतील बांधकाम व्यावसायिक अभिजित खराडे यांना काही दिवसांपूर्वी गाठले. त्यांना ६३ लाख द्या, त्या बदल्यात ३ कोटी २० लाखांचा परतावा देतो, असे आमिष दाखवले होते. चौकशीत तो ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या बड्या व्यापाऱ्यांना गाठत होता.

लोकांना स्वीस बॅंकेचे मोठे चलन उपलब्ध आहे. ते चलनात रूपांतर करण्यासाठी लाखो रुपयांची शाईची गरज आहे, अशी बतावणी करत होता. तसेच हातचलाखीद्वारे कागदांचे रूपांतर युरोज्‌मध्ये केल्याचे तो भासवत होता. याने ६० लाखाला ३ कोटी रुपये देतो, असे आमिष दाखवून गंडा घालण्याचे तंत्र वापरले.

त्याने सांगली, विटा येथील व्यापाऱ्यांना सुमारे एक कोटींचा गंडा घातल्याच्याही तक्रारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे प्राप्त झाल्या आहेत. फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्‍यता आहे. चौकशीत त्याने बनावट नावाच्या पासपोर्टचा आधार घेतला. त्याचे ॲथोनी ओमानिया असे खरे नाव असल्याचे तपासात पुढे आले. गेल्या दोन वर्षापासून कोल्हापुरात वास्तव्यास होता. तो केनियन नसून नायजेरियाचा रहिवासी असल्याचेही तपासात पुढे आल्याचे सावंत यांनी सांगितले. त्याला न्यायालयाने १३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

मुथायला पोलिस कोठडी
इचलकरंजी - शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलेल्या मुथाय इसाह याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याने आणखी काही गुन्हे केल्याचा संशय असून, त्याची कसून चौकशी केली जात आहे.

येथील बांधकाम व्यावसायिक अभिजित खराडे यांच्याशी नायजेरियन नागरिक मुथाय इसाह याने सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला होता. त्याने खराडे यांची भेट घेऊन मोठी रक्कम असून गुंतवण्याचे आमिष दाखविले होते. परदेशी चलनातून भारतीय चलनाची दुप्पट रक्कम देऊ, असे सांगून खराडे यांच्याकडे ६३ लाख मागितले होते. त्यापोटी ३ कोटी २० लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले होते, परंतु फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर खराडे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

नो सर...
संशयित भामटा ॲथोनी ओमानिया ऊर्फ मुथाय इसाह याची पोलिसांनी इंग्रजी भाषेत चौकशी सुरू केली. त्याला तो प्रतिसाद देत होता. मात्र, त्याची पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना शंका आली. त्यांनी त्याला 'मराठी कळते का?' असा प्रश्‍न केला. त्यावर त्याने ‘नो सर’ असे उत्तर दिले. यावरून त्याला मराठी समजते हे सत्य पुढे आले.

Web Title: fraud by Nigerian citizen