ऑनलाइन मागविला मोबाईल हॅण्डसेट, पार्सलमध्ये आला कपड्याचा साबण! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

मोबाईलवरून ऑनलाइन पद्धतीने आय स्टोअरवरून मोबाईल हॅंडसेट बुक केला. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सतरा हजार रुपये पाठविले. कंपनीने रोहित याच्यामार्फत पार्सल पाठविले होते. पार्सल देवून तो निघून गेला. प्रभूपद याने कंपनीकडून आलेले पार्सल उघडून पाहिले. पार्सलमध्ये मोबाईल नव्हता तर त्यात कपडे धुण्याचा साबण होता.

सोलापूर : सतरा हजार रुपयांचा ऑनलाइन मोबाईल हॅण्डसेट विकत घेतल्यानंतर पार्सलमध्ये कपडे धुण्याचा साबण आला आहे. याप्रकरणात जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पार्सल आणून देणाऱ्या रोहित गजेंद्र मालवीय (रा. बद्रिनाथ नगर, मध्य प्रदेश) यास अटक केली आहे. त्याची दोन दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे. 

प्रभूपद श्रीनिवास आरकल (वय 19, रा. गायत्री बिल्डिंग जोडबसवण्णा चौक, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. मामेभाऊ केदारनाथ याने प्रभूपदसाठी त्याच्या मोबाईलवरून ऑनलाइन पद्धतीने आय स्टोअरवरून मोबाईल हॅंडसेट बुक केला. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सतरा हजार रुपये पाठविले. कंपनीने रोहित याच्यामार्फत पार्सल पाठविले होते. पार्सल देवून तो निघून गेला. प्रभूपद याने कंपनीकडून आलेले पार्सल उघडून पाहिले. पार्सलमध्ये मोबाईल नव्हता तर त्यात कपडे धुण्याचा साबण होता. चिडलेल्या प्रभूपद याने डिलिव्हरी पार्सल देणाऱ्या रोहितचा शोध घेतला. रितेश हॉटेल परिसरात थांबलेला रोहितला प्रभूपद याने ताब्यात घेतले. त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ऑनलाइन पैसे पाठविल्यानंतर मोबाईल हॅंडसेट न देता कपडे धुण्याचा साबण पाठवून सतरा हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक आर.डी.पठाण तपास करीत आहेत. 

पार्सलमध्ये मूळ वस्तू न पाठवता दगड किंवा अन्य साहित्य पाठविल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. ऑनलाइन खरेदीमध्ये अनेकदा फसवणुकीच्या घटना घडतात. ऑनलाइन पद्धतीने मोबाईल किंवा कोणतीही वस्तू खरेदी करताना दक्षता घ्यावी. 
- मधुरा भास्कर, पोलिस उपनिरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

Web Title: Fraud By Online Shopping In Solapur