कोल्हापूर : मुळ वेतनात फेरफार करून तीन लाखांचा अपहार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

  • कोल्हापूर मार्केट यार्ड येथील खत नियंत्रण प्रयोग शाळेतील लिपीकाने केला मूळ वेतनात फेरफार करून तीन लाखापेक्षा जास्त रकमेचा अपहार. 
  • या प्रकरणी त्याच्यावर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल
  • राजेश बापू संकपाळ (रा. मंगळवार पेठ, मिरज, सांगली) असे त्याचे नाव
  • कर्ज प्रकरणासाठी कार्यालयीन प्रमुखाच्या खोट्या सही, शिक्‍क्‍याचाही वापर केल्याचा त्याच्यावर ठपका.

कोल्हापूर - मार्केट यार्ड येथील खत नियंत्रण प्रयोग शाळेतील लिपीकाने मूळ वेतनात फेरफार करून तीन लाखापेक्षा जास्त रकमेचा अपहार केला आहे. या प्रकरणी त्याच्यावर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. राजेश बापू संकपाळ (रा. मंगळवार पेठ, मिरज, सांगली) असे त्याचे नाव आहे. कर्ज प्रकरणासाठी कार्यालयीन प्रमुखाच्या खोट्या सही, शिक्‍क्‍याचाही वापर केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मार्केटयार्ड येथे शासनाची खत नियंत्रण प्रयोग शाळा आहे. या  प्रयोगशाळेत संशयित राजेश बापू संकपाळ हा लिपिक म्हणून काम करतो. तसेच कार्यालयीन प्रमुख म्हणून कार्यालयीन प्रमुख सारिका धनाजीराव पाटील (वय 31, रा. विश्रामबाग सांगली) या सेवा बजावतात. शासनाने निश्‍चित केलेल्या मूळ वेतनात त्याने आपल्या अधिकाराचा गैर वापर करून फेरफार केला. त्याआधारे त्याने 10 ऑक्‍टोबर 2014 ते 30 एप्रिल 2019 या काळात तब्बल तीन लाख सहा हजार 339 येवढ्या शासनाच्या रक्कमेचा अपहार केला. तसेच स्वतःच्या कर्ज प्रकरणासाठी लागणाऱ्या वेतन दाखल्यावर कार्यालयीन प्रमुख म्हणून स्वतःच स्वाक्षऱ्या करून शासकीय शिक्‍क्‍यांचा गैरवापर केला. अशी फिर्याद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादेत म्हटले आहे. त्यानुसार संशयित राजेश संकपाळ याच्यावर गुन्हा दाखल केला असल्याचे मोरे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fraud In the salary in fertilizer control laboratory