कुष्ठरोग निर्मूलनाचा दावा ठरला फसवा

सुधाकर काशीद
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

१६ जिल्ह्यांत नवीन ४१३४ रुग्ण आढळले; लवकरच पुणे, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात मोहीम

१६ जिल्ह्यांत नवीन ४१३४ रुग्ण आढळले; लवकरच पुणे, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात मोहीम

कोल्हापूर - आपला जिल्हा कुष्ठरोगमुक्त असे सांगण्याची प्रत्येक जिल्ह्यात टुमच निघाली आणि कुष्ठरोगाचे जवळजवळ निर्मूलनच झाले, असे वाटायची वेळ आली. पण राज्यात वास्तव वेगळेच असल्याची माहिती राष्ट्रीय कुष्ठरोग शोध मोहिमेत पुढे आली आहे. १९ सप्टेंबर ते ४ ऑक्‍टोबर या काळात राबवलेल्या मोहिमेत ४१३४ नवीन कुष्ठरोगी मिळून आले आहेत. ही आकडेवारी फक्त १६ जिल्ह्यांतील आहे. पण या आकडेवारीचे प्रमाण पाहता शासन यंत्रणेने गंभीरतेने या मुद्द्याकडे लक्ष घातले आहे. आता काही दिवसांत पुणे, सोलापूर, कोल्हापूर व कोकणात ही मोहीम हाती घेतली जाणार आहे.

कुष्ठरोगाचे निर्मूलन झाले असे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात हा आजार अद्यापही ठिकठिकाणी घर करून आहे आणि कुष्ठरोगाबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती करूनही अद्याप लोकांत कुष्ठरोग आपल्याला कसा काय होईल हीच समजूत आहे. त्यामुळे अंगावर एखादा चट्टा दिसला तर तो तपासून घ्यायलाच जायचा नाही असा प्रकार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात दडलेले अनेक रुग्ण अजूनही अंधारातच आहेत. आता राज्यातील १६ जिल्ह्यांत ४१३४ नवीन रुग्ण मिळाले आहेत. उरलेल्या जिल्ह्यांत ही मोहीम राबवल्यानंतर चित्र अधिकच ठळक दिसू शकणार आहे.

कुष्ठरोगाचे निर्मूलन झाले असे वातावरण असले तरीही केंद्रीय कुष्ठरोग उपचार विभागाचे उपमहासंचालक डॉ. अनिलकुमार यांना कुष्ठरोग कागदोपत्री निर्मूलन झाले असले तरी अशा कागदोपत्री अहवालावर ते समाधानी नव्हते. त्यामुळे त्यांनी राज्यातील कुष्ठरोग उपचार सहसंचालकांना ‘घर टू घर’ अशा पद्धतीने तपासणीचे आदेश दिले. त्यासाठी पहिल्यांदा १६ जिल्हे निवडले. त्यासाठी २७ हजार टीम केल्या. प्रत्येक टीममध्ये एक महिला व एक पुरुष असे आरोग्य कर्मचारी होते. त्यांनी १६ जिल्ह्यांत घरटी प्राथमिक तपासणी केली. त्यात ९७ हजार संशयित रुग्ण मिळाले व अंतिम तपासणीत ४१३४ जण खरोखर रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. वास्तविक लाखात एक कुष्ठरुग्ण मिळाला तर कुष्ठरोगाचे बऱ्यापैकी निर्मूलन झाले, असे मानले जाते. पण येथे ९७ हजारांत ४१३४ रुग्ण सापडले.

कुष्ठरोग प्राथमिक टप्प्यात शरीरावरील चट्ट्याद्वारे ओळखता येतो.

शरीरावर पांढरा, लाल, तेलकट असा चट्टा असला व तो चट्टा वेदनारहित असला तर कुष्ठरोगाचा प्राथमिक अंदाज केला जातो. या प्राथमिक टप्प्यात उपचार झाले तर रोगाची वाढ थांबते. रुग्णांच्या वाट्याला येणारा पुढचा त्रास थांबतो. पण कुष्ठरोगाबद्दल इतकी भीती आहे की, तो आपल्याला असेल अशी शंकाही कोणी व्यक्त करत नाही आणि आपल्याला असण्याची शक्‍यता तपासून घ्यायलाही कोणी जात नाही. त्यामुळे रुग्ण दडून राहतो. याच वेळी जिल्हा पातळीवरील आरोग्य यंत्रणाही आपल्या जिल्ह्यात कुष्ठरोगी नाहीत, असे भासवण्याचा प्रयत्न करते व वस्तुस्थिती दडली जाते.

आता राज्याचे कुष्ठरोग सहसंचालक डॉ. संजीव कांबळे, सहायक संचालक डॉ. रामजी आडकेकर, डॉ. रोकडे, डॉ. राजुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात दडलेले कुष्ठरोग शोधून काढण्यात येत आहेत आणि त्यातून वास्तव समोर येत आहे.

सर्वाधिक रुग्ण पालघरमध्ये
नागपूर, जळगाव, अमरावती, नाशिक, भंडारा, धुळे, रायगड, वर्धा, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, नंदूरबार, पालघर, ठाणे, चंद्रपूर 
या जिल्ह्यांची कुष्ठरोग तपासणी मोहीम पूर्ण झाली आहे. त्यातील सर्वाधिक म्हणजे ५२३ रुग्ण पालघरमधील आहेत. नाशिकमध्ये ३१५ आहेत. पुणे, सोलापूर, कोल्हापूर व सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात पुढील टप्प्यात ही तपासणी आहे.

Web Title: Fraudulent claim was to eradicate leprosy