फसव्या हवामान अंदाजाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडतेय 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

सध्याच्या हवमान अंदाजानुसार बुधवारपासून (ता. 4) पाऊस सुरु होईल. शेतकऱ्यांनी विलंबाने पेरणी करावी लागेल. काही शेतकऱ्यांवर फेरपेरणीची वेळ येईल.

सांगली : गेल्या आठ-दहा दिवसापासून पावसाने दडी दिल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यात साठ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. बागायत क्षेत्र वगळता जिरायत आणि हलक्‍या माळरानातील आगाप पेरणीच्या ठिकाणी पिकांनी माना टाकल्या आहेत. उशिरा पेरा झालेल्या ठिकाणी उगवणीपूर्वीच ब्रेक लागला आहे. सध्याच्या हवमान अंदाजानुसार बुधवारपासून (ता. 4) पाऊस सुरु होईल. शेतकऱ्यांनी विलंबाने पेरणी करावी लागेल. काही शेतकऱ्यांवर फेरपेरणीची वेळ येईल. आणखी आठवडाभर पाऊस झालाच नाही तर मात्र खरीपांच्या आशा संपुष्टात येण्याचा धोका आहे. 

प्रत्येक वर्षी भारतीय हवामान खात्यांकडून पावसांचे अंदाज वर्तवले जातात मात्र त्यातील बहुतांश अंदाज बरोबर येत नाहीत. हवामान खात्यांचे अंदाज बरोबर येतील, या आशेवर शेतकरी पेरणी करतात मात्र अश्‍या वेळी त्यांच्या पदरी निराशाच पडत असल्याचे गेल्या दोन वर्षातील चित्र आहे. जुनच्या शेवटी पाऊस कमी असतानाही शेतकऱ्यांनी अपुऱ्या ओलींवर पेरणी केली. अर्थात तो शेतकऱ्यांनी खेळलेला जुगारच ठरला. अशा वेळी शासनाच्या राज्य अथवा जिल्हा कृषि विभागाने शेतकऱ्यांनी पेरणी करवी किंवा नको याबाबत नेहमीच तोंडावर बोट ठेवणे पसंत केले अन्‌ शेवटी शेतकरी दाणाला जातानाचे चित्र यंदाही कायम राहिले. 

कृष्णा, वारणा नदीकाठावरील वाळवा, शिराळा, पलूस तालुक्‍यात सोयाबिन, भुईमुग, उडीद, मक्का पिकांची आगाप पेरणी झाली. त्यांची स्थिती आजही चांगली आहे. शिराळा तालुक्‍यात भाताची धूळवाफेवर पेरणी झाली असली तरी पिकांची वाढ समाधानकारक नाही. आटपाडी तालुक्‍यात परतीच्या पावसांवरच अधिक पेरणी होते. जत आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यात अपुऱ्या पावसावरील पिकांनी माना टाकल्या आहेत. मिरज पूर्व आणि तासगाव तालुक्‍यात पेरण्या झाल्या असल्या तरी पिकांची वाढ खुंटली आहे. वाळवा तालुक्‍यातील बागायत क्षेत्रात पिक स्थिती चांगली तर जिरायतमध्ये पीकांची होरपळ सुरु झालेली आहे. 
 
एक दृष्टिक्षेप -

  •  जिल्ह्यात पावसाअभावी पावणेदोन लाख हेक्‍टर क्षेत्र पेरणीविना 
  • बियाणे, खतांची गोदाम खपाविना हाऊसफुल्ल 
  •  खरीपात ज्वारी 64 हजार हेक्‍टर, सोयाबीन 58800 हेक्‍टरवर क्षेत्राचा आराखडा 

"हवमान खात्यांचे अंदाज केवळ शेअर बाजारात तेजी आणण्यासाठीच असतात काय?, असे वाटते आहे. तसा प्रयत्न असेल मात्र किमान शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये पाण्यात गेल्यानंतर सरकारला जाग येते. सद्यस्थितीत फेरपेरणी अथवा हंगाम वाया गेल्यास हेक्‍टरी किमान 10 हजार रुपये मदतीची गरज आहे.'' - संजय गडदरे, कवलापूर. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Fraudulent weather is causing farmers damage at sangli