पोलिसांनी अनुभवला टेन्शन फ्री बंदोबस्त !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

सोलापूर - पोलिसांनी बुधवारी टेन्शन फ्री बंदोबस्त अनुभवला. मोर्चासाठी लाखोंची संख्या जमूनही घोषणाबाजी, गोंधळ न झाल्याने पोलिसांच्या चेहऱ्यावर ताण दिसत नव्हता. दोन हजार पोलिसांनी लाखो मोर्चेकऱ्यांसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.

सोलापूर - पोलिसांनी बुधवारी टेन्शन फ्री बंदोबस्त अनुभवला. मोर्चासाठी लाखोंची संख्या जमूनही घोषणाबाजी, गोंधळ न झाल्याने पोलिसांच्या चेहऱ्यावर ताण दिसत नव्हता. दोन हजार पोलिसांनी लाखो मोर्चेकऱ्यांसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.

सोलापूरकडे येणाऱ्या प्रत्येक मार्गावर बुधवारी सकाळपासूनच चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. चौकाचौकांत पोलिसांचे पथक मोर्चेकऱ्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. मोर्चाच्या मार्गावरील आणि होम मैदान परिसरातील उंच इमारतींवरून पोलिस टेहळणी करीत होते. होम मैदानावर चारही बाजूंला पोलिसांचे पॉइंट होते. एखादी व्यक्ती हरविल्यास तिला शोधण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीच्या समोरील तंबूमध्ये पोलिसांनी स्वतंत्र व्यवस्था केली होती. स्वयंसेवकांची पोलिसांना मोठी मदत झाली. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यापासून ते मोर्चेकऱ्यांना मैदानावर शिस्तीने पोचविण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी स्वयंसेवक धावपळ करीत होते.
 

असा होता बंदोबस्त
पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या नेतृत्वाखाली तीन पोलिस उपायुक्त, चार सहायक पोलिस आयुक्त, 18 पोलिस निरीक्षक, 77 सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, 1116 पुरुष पोलिस कर्मचारी, 212 महिला पोलिस कर्मचारी, राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी, 500 होमगार्ड असा बंदोबस्त होता.

ठळक :
- पोलिसांच्या दहा कॅमेरामनकडून चित्रीकरण
- 14 इमारतींवरून प्रत्येक हालचालींवर ठेवले लक्ष
- शहराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर होता बंदोबस्त
- होम मैदानावर हरविलेल्यांना शोधण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
 

लाखोंची गर्दी जमूनही मोर्चा शांततेत पार पडला ही स्वागतार्ह बाब आहे. मोर्चेकऱ्यांनी पोलिसांना सहकार्य केले. त्यांना तसेच सोलापूरकरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी आम्ही घेतली.
- रवींद्र सेनगावकर, पोलिस आयुक्त
 

आम्ही शहराकडे येणाऱ्या सर्वच मार्गांवरील जड वाहतूक बंद केली होती. बंदोबस्तासाठी वारीच्या नियोजनाचा अनुभव उपयुक्त ठरला. शिस्तीने येणाऱ्या मोर्चेकऱ्यांसह सर्वांनीच सूचनांचे पालन केल्याने पोलिसांना त्रास झाला नाही.
- वीरेश प्रभू, पोलिस अधीक्षक

Web Title: Free experienced tension strict police!