विठ्ठलाच्या दारी, मोफत रेल्वे वारी 

विठ्ठलाच्या दारी, मोफत रेल्वे वारी 

मिरज - पंढरीच्या विठूमाऊलीच्या भेटीला निघालेल्या भक्तांना रेल्वे तिकिटे चक्क मोफत मिळणार आहेत. कराड, किर्लोस्करवाडी, जत स्थानकांत उपक्रम राबवला जाईल. विठ्ठलभक्तांच्या सेवेबरोबरच या मार्गावरील रेल्वे तोट्यात जाऊ नये हा देखील उद्देश आहे. 

पंढरपूरची आषाढी यात्रा 12 जुलै रोजी आहे. यासाठी मध्य रेल्वेने विविध मार्गांवर जादा गाड्या सोडल्या आहेत. पुणे - कराड - मिरजमार्गे पंढरपूरसाठी यंदा प्रथमच जादा गाडी धावणार आहे. या मार्गावर अनेक दिवसांपासून नियमित रेल्वे सोडावी यासाठी प्रवाशी संघटना पाठपुरावा करत आहेत. यात्रेच्या निमित्ताने जादा गाडी सोडण्यात येत असल्याने ही मागणी अंशतः पुर्ण झाली आहे.

जादा गाडीला भरपूर प्रवासी मिळाले तर ती कायमस्वरुपी सोडण्याचा विचार रेल्वे करु शकते. हे लक्षात आल्याने काही प्रवासी संघटना व रेल्वेशी संबंधित काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या गाडीला जास्तीजास्त प्रवासी यावेत यासाठी धडपड सुरु ठेवली आहे. 

किर्लोस्करवाडीमध्ये शिवसेनेचे विभागप्रमुख व पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजाभाऊ माने यांनी परीसरातील वारकऱ्यांना नावनोंदणीचे आवाहन केले आहे. 12 जुलैच्या रात्री पंढरपुरला जाणाऱ्या वारकऱ्यांना मोफत तिकिट दिले जाईल, असे जाहीर केले आहे. एका प्रवाशासाठी 75 रुपये तिकिट आहे. ते म्हणाले, वारकऱ्यांची सेवा व्हावी आणि रेल्वेला प्रवासी मिळावेत यासाठी हा उपक्रम राबवत आहे.

किर्लोस्करवाडी, दुधोंडी, बुर्ली येथील वारकऱ्यांना लाभ मिळेल. 
कराडमध्ये सल्लागार समितीचे सदस्य गोपाल तिवारी विठ्ठलभक्तांना जनरल श्रेणीचे 80 रुपयांचे तिकिट मोफत देणार आहेत. अधिकाधिक भक्तांना विठुमाऊलीच्या भेटीला जाता यावे आणि रेल्वेचे उत्पन्न वाढावे यासाठी उपक्रम असल्याचे ते म्हणाले. 

जतरोड स्थानकात जत तालुका विकास मंच शंभर प्रवाशांना 120 रुपयांचे तिकिट देतील. पुण्याला परतणार्या प्रवाशांसाठी ही सुविधा आहे. मंचाचे सदस्य नजीर नदाफ, किरण इथापे, युवराज शिंदे, महेश माने आदी तरुण उपक्रम राबवताहेत.

श्री नदाफ म्हणाले, जत भागातील शेकडो कुटुंबे पुण्यात राहतात. त्यांना पुणे ते जत थेट रेल्वे नाही. आषाढी यात्रा स्पेशल गाडीच्यानिमित्ताने प्रथमच गाडी मिळाली आहे. तिला पुरेसे उत्पन्न मिळाल्यास कायम ठेवण्याचा विचार रेल्वे करेल. जत, वाळेखिंडी, शेगाव, बनाळी, सिंगनहळ्ळी, औंढी येथील प्रवाशांसाठी ही सोय आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com