प्रभाग रचना हरकतींवर शुक्रवारी सुनावणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

पालिका क्षेत्रातून एकूण 62 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात चुकीची भौगोलिक सलगता नसलेली प्रभाग रचना केली आहे.

सांगली - महापालिका निवडणुकीसाठी नव्याने केलेल्या प्रभाग रचना व आरक्षणाबाबत दाखल हरकतींवर येत्या शुक्रवारी (ता.13) सुनावणी होत आहे. माधवनगर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात सकाळी दहापासून सुनावणीच्या प्रक्रियेस प्रारंभ होईल. ही माहिती महापालिकेच्या प्रसिध्दी विभागातर्फे देण्यात आली आहे. 

पालिका क्षेत्रातून एकूण 62 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात चुकीची भौगोलिक सलगता नसलेली प्रभाग रचना केली आहे. मागासवर्गींयांना आरक्षणात योग्य प्रतिनिधित्व मिळालेले नाही, मतदारसंख्येचे प्रगणक गट फोडून प्रभाग रचना केली आहे. निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिली आहे. प्रभाग रचनेची पुरेशी माहिती जनतेला दिलेली नाही आदी स्वरुपाचे आक्षेप व हरकती आहेत. 

आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यासमोर सुनावणीची प्रक्रिया होईल. यासाठी निवडणूक आयोगातर्फे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव श्री.पी अनबलगन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीसमोर सुनावणी होणार आहे. सुनावणीचा अहवाल 23 एप्रिलपर्यंत पाठवावा असेही राज्य निवडणूक आयोगाने आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Friday hearings on the Ward Structure objections