राजकारणात दोस्त, दोस्त ना रहा...

राजकारणात दोस्त, दोस्त ना रहा...

कोल्हापूर - राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतोच. जिल्ह्याच्या २०-२५ वर्षांच्या राजकारणावर नजर टाकली, तर हे अनेकदा अनुभवायला मिळाले आहे. कालपर्यंत एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे राजकारणी आज एकमेकांविरोधातच उभे ठाकल्याचे जिल्ह्याने पाहिले आहे. मित्रांतील वादाची ही परंपरा आजही कायम आहे. 

अगदी (कै.) रत्नाप्पा कुंभार, (कै.) बाळासाहेब माने, (कै.) श्रीपतराव बोंद्रे यांच्यापासून ते अलीकडच्या नव्या पिढीच्या नेत्यांतही या वादाची लागण झाल्याचे दिसते. त्या-त्यावेळची राजकीय परिस्थिती आणि त्यातील भूमिका हेच या वादामागचे कारण आहे. अशा सर्व नेत्यांच्या वादावर नजर टाकली, तर संगम चित्रपटातील ‘दोस्त, दोस्त ना रहा’ या गाण्याच्या ओळी आठवल्याशिवाय राहत नाहीत. 

राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्‍यातील (कै.) सदाशिवराव मंडलिक व आमदार हसन मुश्रीफ या गुरू-शिष्यात कधी वादाची ठिणगी पडेल, असे वाटत नव्हते, पण जिल्हा बॅंकेतील अध्यक्षपदाचा वादाचे निमित्त झाले आणि अनेक वर्षे एकमेकांशिवाय राहू न शकणारे हे दोन नेते वेगळे झाले. त्यातून एकमेकांवर टीका, राजकीय अस्तित्वासाठीची लढाई यातून फायदा कमी आणि पक्षाबरोबरच वैयक्तिक नुकसानच जास्त झाल्याचे दिसून येते. 

शेट्टीविरुद्ध खोत, उल्हास पाटील
साधारण १७ - १८ वर्षांपूर्वी शरद जोशी यांच्या संघटनेतून खासदार राजू शेट्टी बाहेर पडले, त्या वेळी त्यांच्याबरोबर मुलुखमैदानी तोफ समजले जाणारे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व आमदार उल्हास पाटील होते. हे दोघे म्हणजे श्री. शेट्टी यांचे उजवा व डावा हात; पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत श्री. पाटील यांना डावलून श्री. शेट्टी यांनी सावकर मादनाईक यांना संघटनेची उमेदवारी दिली आणि त्यातून उल्हास पाटील चिडले व त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन विधानसभा जिंकली. त्यांच्या या विजयामागे अनेक कारणे असली तरी एक हात यानिमित्ताने श्री. शेट्टी यांच्यापासून दुरावला. त्यानंतर श्री. खोत यांना भाजपने मंत्री केले. मंत्री झाल्यानंतर श्री. खोत व श्री. शेट्टी यांच्यातच बिनसले. सरकारला शेतकरी नेत्यांत फूट हवी होती, जे हवे होते ते झाले आणि एकेकाळी हातात हात घालून फिरणारे हे दोन नेते वेगवेगळे झाले.

हसन मुश्रीफ-समरजितसिंह घाटगे
(कै.) सदाशिवराव मंडलिक व आमदार हसन मुश्रीफ यांच्यात वाद झाल्यानंतर (कै.) विक्रमसिंह घाटगे गट हा नेहमी श्री. मुश्रीफ यांच्या बाजूने राहिला. यामागे (कै.) घाटगे यांचा 
माजी आमदार संजय घाटगे यांना असलेला विरोध हे कारण होते. विक्रमसिंह यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र समरजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली. तेव्हापासून मुश्रीफ-समरजितसिंह एकमेकांपासून दुरावले. या लोकसभेला तरी समरजितसिंह यांच्याबरोबर माजी आमदार घाटगे आहेत. विधानसभेला ते तसेच राहतात का, हा 
प्रश्‍न आहे.

सतेज पाटील-धनंजय महाडिक
कॉलेज जीवनापासून एकमेकांचे जिगरी दोस्त अशी या दोघांची ओळख. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत श्री. महाडिक यांनी (कै.) सदाशिवराव मंडलिक यांच्याच विरोधात शिवसेनेची उमेदवारी घेऊन शड्डू ठोकला. या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांची मोठी ताकद श्री. महाडिक यांच्या मागे होती. ही ताकद छुप्या पद्धतीने असली तरी ती दिसून येत होती. या बदल्यात श्री. महाडिक यांनी विधानसभेला श्री. पाटील यांना मदत केली; पण २००७ पासून या जिवलग मित्रांतच बिनसले आणि त्यातून २००९ मध्ये सतेज विरुद्ध धनंजय अशी लढत विधानसभेला झाली. गेल्या लोकसभेला आघाडी म्हणून पाटील यांनी श्री. महाडिक यांना मदत केली; पण आता या दोघांतील वाद इतका टोकाला गेला आहे, की या वादानेच कोल्हापूरचे राजकारण अलीकडे गाजत आहे. 

पी. एन. पाटील-प्रकाश आवाडे
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावरून पी. एन. पाटील - प्रकाश आवाडे या दोघांत मोठा वाद झाला. त्यानंतर जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्यावरून हे एकाच पक्षातील दोन नेते एकमेकांवर टीका करू लागले. त्यात अलीकडेच श्री. आवाडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हा वाद मिटेल, असे वाटत असताना तो आणखी वाढल्याचे दिसते. श्री. आवाडे यांनी हा वाद संपल्याचे जाहीर केले असले तरी येणाऱ्या निवडणुकांचा निकालच खरोखरच हा वाद संपला का नाही, ते सांगू शकेल. 

प्रकाश आवाडे - जयवंतराव आवळे
या दोघांतील हातकणंगले विधानसभेवरून मध्यंतरी वाद झाला. त्यात इचलकरंजी नगरपालिकेचेही संदर्भ होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आवाडे गटाला डावलून पक्षाने आवळे यांच्या उमेदवारांना उमेदवारी दिल्यानंतर या दोघांतील वाद विकोपाला गेला. एकेकाळचे हे दोघेही मित्र, पण नंतर दुरावले. आता हा वादही संपल्याचे श्री. आवाडे यांनी जाहीर केले आहे. 

आमदार राजेश क्षीरसागर - संजय पवार
२००९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून शहरातून श्री. क्षीरसागर विजयी झाले. त्यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार हे त्यांच्यासोबत होते. त्यानंतर या दोघांतही शहर कार्यकारिणीवरून बिनसले. त्यात श्री. क्षीरसागर यांना घेतलेल्या राजकीय भूमिकेला श्री. पवार यांचा विरोध होता. श्री. पवार हे नगरसेवक असताना त्यांच्या कारभाराचा पंचनामा थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत श्री. क्षीरसागर यांनी नेल्याचा आरोप आहे. त्यातून या दोघांत मतभेद तयार झाले. आजही एकमेकांच्या कार्यक्रमाला हे दोघेही आणि त्यांचे कार्यकर्तेही जात नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com