Friendship Day Special : निसर्गभ्रमंतीमधून पक्की होतेय राजकीय नेत्यांची मैत्री!

परशुराम कोकणे 
रविवार, 4 ऑगस्ट 2019

राजकारणात वेगवेगळ्या पक्षांत असले तरी मैत्रीमध्ये राजकारण नाही असाच संकल्प करून सोलापुरातील विविध पक्षांतील नेते, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आपली मैत्री जपली आहे. निसर्गभ्रमंतीच्या माध्यमातून या मैत्रीचा धागा अधिकच पक्का होत आहे.

सोलापूर - राजकारणात वेगवेगळ्या पक्षांत असले तरी मैत्रीमध्ये राजकारण नाही असाच संकल्प करून सोलापुरातील विविध पक्षांतील नेते, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आपली मैत्री जपली आहे. निसर्गभ्रमंतीच्या माध्यमातून या मैत्रीचा धागा अधिकच पक्का होत आहे. 

निसर्गात भटकंती करणाऱ्या या मित्रांच्या समूहात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बरडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, परिवहन समितीचे माजी सभापती राजन जाधव, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, कॉंग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले, विद्यार्थी चळवळीचे गणेश डोंगरे, भारतीय जनता पक्षाचे राजू सुपाते, जलमित्र विलास लोकरे, प्रा. गणेश देशमुख, सुहास कदम, दीपक माळी, योगी काटकर यांच्यासह इतरही मंडळींचा यात सहभाग आहे. 

'आमच्या समूहात पुरुषोत्तम बरडे हे ज्येष्ठ सदस्य असले तरी त्यांचं वागणं अगदी तरुण मित्रांसारख आहे. सर्वांच्या गप्पा, सहवासातून खूप काही शिकता येतं. आम्ही सगळेच एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतो. कोणत्याही प्रकारच्या अडचणीला धावून जातो. सर्वजण कौटुंबिक आनंदातही सामील होतात', असे नगरसेवक विनोद भोसले यांनी सांगितले. 

'आम्ही सर्व मित्र वेगवेगळे कार्यक्रम, राजकीय बैठकांच्या निमित्ताने भेटतच असतो, पण निसर्गभ्रमंतीच्या माध्यमातून या मैत्रीला सकारात्मक दिशा मिळाली आहे. निसर्गात फिरून मनाला शांती मिळते. ज्याप्रमाणे आपण आपली मैत्री जपतो, त्याप्रमाणे सर्वांनी आपला निसर्गही जपला पाहिजे,' असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले. 

आधीपासूनच आम्ही एकत्र होतोच, दरम्यानच्या काळात मराठा आंदोलनामुळे आमच्या वारंवार भेटी होत राहिल्या. आमच्यातील समज-गैरसमजही दूर झाले. आम्ही एकत्रित निसर्गात फिरायलाही जातो. आजवर रायगड, प्रतापगड, महाबळेश्‍वर, पन्हाळगड, पावनखिंड, कोकण यासह विविध ठिकाणी भटकंती केली आहे. निसर्गात फिरायला गेल्यानंतर राजकारणविरहित चर्चा होते. रोजच्यापेक्षा वेगळ्या वातावरणात भ्रमंती करून उत्साह वाढतो. 
- विनोद भोसले, नगरसेवक, कॉंग्रेस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Friendship Day Special Political Leader Friends