#FriendshipDay अंध मैत्रिणींचा डोळस जीवनाधार

सुधाकर काशीद
रविवार, 5 ऑगस्ट 2018

या शाळेत अशीच अंध पन्नास मुले-मुली आहेत. यातल्या कोणीच कोणाचा चेहरा पाहिलेला नाही, हे वास्तव आहे. पण, या दोन अश्‍विनींची मैत्री म्हणजे जणू मैत्रीचा आगळावेगळा चेहराच. 

कोल्हापूर - या दोघींचंही नाव अश्‍विनी. एकीचं वय तेरा, दुसरीचं चौदा. दोघी कायम एकत्र. पण, हिचा चेहरा तिने आणि तिचा चेहरा हिने पाहिलेला नाही. कारण दोघीही जन्मजात अंध. दोघीही जिवाभावाच्या मैत्रिणी. या दोन अंध मैत्रिणींनी एका डोळस मैत्रीचा आदर्श उभा केला आहे. अवघ्या तेरा-चौदा वर्षांच्या या दोघींकडे जणू काही उभं आयुष्य कोळून प्यायलासारखा एक अनोखा समजूतदारपणा दिसून येतो. 

मिरजकर तिकटीला ज्ञानप्रबोधन संचालित अंधशाळा आहे. तिथे या दोघी राहतात. दोघींनाही जन्मापासून दृष्टी नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी या मुली शिकाव्यात, या हेतूने या शाळेत घातले. दोघी वेगवेगळ्या कुटुंबांतल्या. पण, शाळेत दाखल झाल्या आणि एकमेकींना न पाहताही काही दिवसांत मैत्रिणी झाल्या. 

या शाळेत अशीच अंध पन्नास मुले-मुली आहेत. यातल्या कोणीच कोणाचा चेहरा पाहिलेला नाही, हे वास्तव आहे. पण, या दोन अश्‍विनींची मैत्री म्हणजे जणू मैत्रीचा आगळावेगळा चेहराच. 

या शाळेत सकाळी साडेसहाला जो तो उठतो. आपल्या कपाटाजवळ जातो. बरोबर त्याच्या हातात टूथब्रश येतो. आणि या सकाळच्या क्षणापासूनच दोन्ही अश्‍विनींना मैत्रीचा आधार मिळू लागतो. कधी एकीची पेस्ट संपलेली असते, मग दुसरी तिच्या ब्रशवर आपली पेस्ट घालते. कधी एकीने अंथरुणाची घडी घातलेली नसते, मग दुसरीच्या पायात अंथरुण अडकले की ती अंथरुणाची घडी घालते. मग दोघी एकमेकींचे केस विंचरतात. एकीला केसाला बो आवडतो, दुसरीला फक्‍त एका बाजूला भांग लागतो. विंचरून झाले की दोघी केसांवर हलकासा हात फिरवतात. आणि आपल्या मैत्रिणीने आपले केस विंचरलेत म्हटल्यावर ते छानच असणार म्हणून फक्त गालात हसतात. 

यातल्या एका अश्‍विनीला सारखी आपल्या आई-बाबा, ताई, दादा, आजोबांची आठवण येते. रात्री झोपताना तिचं हे मुसमुसणं फक्त दुसऱ्या अश्‍विनीलाच जाणवतं आणि असं रडायचं नाही, असं घाबरायचं नाही, म्हणून दुसरी अश्‍विनी समजूत काढते. आणि त्यानंतर दोघींनाही गाढ झोप लागते. 

दोन्ही अश्‍विनी अभ्यासात खूप हुशार. दोघींनाही गाणं म्हणायला आवडतं. एक तर नाट्यगीत गायचा प्रयत्न करते. दुसरी पुस्तकातल्या कविता खूप छान म्हणते. इतक्‍या मनापासून ती कविता म्हणते, की कवितेतल्या शब्दा-शब्दांत ती आपला कोवळा जीव ओतते. यातल्या एकीचे नाव अश्‍विनी डफळे आहे. ती बिद्रीची आहे; तर दुसरीचे नाव अश्‍विनी अजाम आहे. ती जयसिंगपूरची आहे. दोघींना दृष्टी नाही. पण, सारी सृष्टी त्या पाहताहेत, असा समजूतदारपणा त्या दोघींकडे आहे. 

एकमेकींना पाहण्याचा विश्‍वास
पुढे-मागे कधी डोळ्यांना दिसायला लागले तर आई, बाबा, देवबाप्पा आणि त्यानंतर पहिल्यांदा एकमेकींना पाहायचे, असा भाबडा विश्‍वास दोघींत आहे... पाहा, आज फ्रेंडशिप डे आहे. आपण एकमेकांच्या हातात रेशमी धागा, प्लास्टिकचे बॅंड बांधत मैत्री ‘साजरी’ करीत आहोत. फेसबुक, व्हॉट्‌सॲप तर फुल्ल झाले, तेही ठीक आहे. पण, या दोघींना दृष्टी येईल यासाठी प्रयत्न करीत या दोघींशी आजपासून मैत्री करायला काय हरकत आहे?
 

Web Title: Friendship Day Special story