भिमा सहकारी साखर कारखान्याकडून थकीत एफआरपी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात

राजकुमार शहा 
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

गेल्या गळीत हंगामात फेब्रुवारी व मार्च या कालावधीत गळीतास आलेल्या ऊसाची एफआरपीची रक्कम कारखान्याने शेतकऱ्यांना अदा केली नव्हती. विविध शेतकरी संघटनांनी याबाबत आवाज उठविला होता. तर शेतकरी आंदोलनेही झाली होती. मात्र राज्यातील सर्वच कारखाने अडचणीत असल्याचे कारखाने प्रशासनाकडून सांगण्यात येत होते.

मोहोळ - टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथील भिमा सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीची सोळा कोटी सत्तावन्न लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. त्यामुळे शासनाकडून कारखान्यावर होणारी आर आर सी ची कारवाई टळली आहे. दरम्यान कारखाना सुरू होण्याची तयारी जवळ जवळ पुर्ण झाली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष खा. धनंजय महाडिक व कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी दिली.

गेल्या गळीत हंगामात फेब्रुवारी व मार्च या कालावधीत गळीतास आलेल्या ऊसाची एफआरपीची रक्कम कारखान्याने शेतकऱ्यांना अदा केली नव्हती. विविध शेतकरी संघटनांनी याबाबत आवाज उठविला होता. तर शेतकरी आंदोलनेही झाली होती. मात्र राज्यातील सर्वच कारखाने अडचणीत असल्याचे कारखाने प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे शेतकरी ही अडचणीत आला होता. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी भिमा कारखाना व सभासद यांचे हित जोपासण्यासाठी कारखान्यावरील आर आरसी च्या कारवाईला स्थगिती दिली होती, मात्र ती अनेकांना रुचली नव्हती.

गेल्या दोन दिवसापासून कारखान्याने एफआरपी ची सोळा कोटी सत्तावन्न लाख रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली. अशा आशयाचे लेखी पत्र जिल्हाधिकारी, साखर आयुक्त व अन्य विभागाला दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. हुमणी बाधीत ऊसा बदल कार्यकारी संचालक पाटील यांना विचारले असता सध्या कारखाना प्रशासनाकडून हुमणी बाधीत क्षेत्राचा सर्वे सुरू आहे. शासनाच्या कृषी विभागाचाही सर्वे सुरू आहे. दोन्ही सर्वेचा अहवाल हाती येताच कारखान्याच्या संचालक मंडळाची लवकरच बैठक होणार असून त्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार आहे. बैठकीत जे धोरण ठरेल त्या प्रमाणे पुढील नियोजन करण्यात येणार आहे. मात्र त्यात सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कारखाना सुरु होण्याअगोदरची पुर्ण तयारी झाली असुन कारखान्याने दोनशे ट्रॅक्टर सातशे बैलगाड्या व दोनशे डंपिंग ट्रॅक्टर बरोबर करार केले आहेत.

Web Title: The FRP amount by the Bhima Cooperative Sugar Factory has accumulated in the farmers account