उर्वरित एफआरपीची जिल्ह्यात प्रतीक्षा

Sugar-Factory
Sugar-Factory

काशीळ - कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील चार कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी देत शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. हा सुखद धक्का सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने कधी देणार असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

जिल्ह्यातील ऊस हंगाम वेगात सुरू आहे. कारखान्यांकडून गाळप क्षमतेपेक्षा जास्त ऊस गाळप होत आहे. यामुळे साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ऊसदराचा कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचा पटर्न सातारा जिल्ह्यात राबविला जातो. त्यानुसार या हंगामात साखरेच्या दरातील घसरण व बॅंकांकडून मिळणारे कर्ज याचे गणित जुळवत जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी दरासाठी ८०-२० असे सूत्र स्वीकारले होते. त्यानुसार शेतकऱ्यांच्या नावे बिलेही जमा केली जात आहेत.

या दरम्यान स्वाभिमानी शेतकऱ्यांनी साखर आयुक्त कार्यालयावर आंदोलन करत संपूर्ण एफआरपी द्यावी अन्यथा त्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील दत्त इंडिया, विश्वास, निनाईदेवी व कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा कारखान्याने एकरकमी एफआरपी देत शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला. यामुळे मिळणारा दर व साखर उताऱ्यात एकरकमी एफआरपी देता येऊ शकते हे सिद्ध झाले आहे. 

मागील चार ते पाच ऊस हंगामात कोल्हापूरचा ऊसदराचा पटर्न सातारा जिल्ह्यात स्वीकारला जात असताना सध्या संपूर्ण एफआरपीबाबत सातारा जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांना मौन बाळगले आहे. यामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता आहे. एफआरपीचे तुकडे झाल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असतानाही साखर कारखान्यांकडून कोणत्याच हालचाली दिसत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त आहे. 

कोण फोडणार कोंडी
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी देत कोंडी फोडली आहे. सातारा जिल्ह्यात कोंडी कोण फोडणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. इतरवेळी दराचा कोल्हापूर पॅटर्न स्वीकारणारे सातारा जिल्ह्यातील कारखाने संपूर्ण एफआरपीचा निर्णय कधी घेणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.  

‘‘स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील काही कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी दिली. हे दराचे अनुकरण जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी लवकरात लवकर करत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावे. अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल.’’  
- सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com