एफआरपी थकलेल्या कारखान्यांनाही गाळप परवाना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

सोलापूर - राज्यातील 38 साखर कारखान्यांकडे मागील गाळप हंगामातील तब्बल 336 कोटी 15 लाख 75 हजार रुपयांची एफआरपी थकली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 11 साखर कारखान्यांकडे 90 कोटी रुपये थकले आहेत. अडचणीत सापडलेल्या साखर कारखान्यांना अनुदानाच्या स्वरूपात मदत करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, त्यावर सोमवार, 8 ऑक्‍टोबर रोजी तोडगा निघणार आहे. त्यामुळे या कारखान्यांना गाळप परवाना मिळण्यास काही अडचण येणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

राज्यातील कारखान्यांकडील थकीत एफआरपीचा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहे. शेतकऱ्यांना लवकरच एफआरपी मिळेल. त्यामुळे सर्व साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यात येईल.
- सुभाष देशमुख, सहकारमंत्री

एफआरपी न दिलेल्या कारखान्यांवर आरआरसीअंतर्गत कारवाई करावी, त्या कारखान्यांचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्‍त करावे. गाळप परवाना देत असताना एफआरपी थकीत कारखान्यांचा निश्‍चित विचार केला जाईल.
- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री

एफआरपी थकलेले कारखाने
तात्यासाहेब कोरे (कोल्हापूर), महाकाली, मानगंगा व डोंगराई (सांगली), न्यू फलटण, ग्रीन पॉवर, स्वराज इंडिया ऍग्रो (सातारा), रायगड (पुणे), संत दामाजी, श्री विठ्ठल, मकाई, कुर्मदास, सिद्धनाथ, गोकूळ, मातोश्री लक्ष्मी शुगर, बबनराव शिंदे, जयहिंद शुगर, विठ्ठल रिफाइंड (सोलापूर), चौपडा, घृणेश्‍वर, वैद्यनाथ, जय भवानी, जय महेश एनएसएल शुगर (औरंगाबाद), बारशीव हनुमान, पूर्णा, बी. चव्हाण, पंगेश्‍वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नॅचरल शुगर, लोकमंगल माउली, शंभू महादेव, सिद्धी शुगर (नांदेड), डॉ. बी. बी. तनपुरे, जय श्रीराम शुगर अँड ऍग्रो, युटेक, वसंतदादा, केजीएस, के. के. वाघ (नगर) या 38 साखर कारखान्यांकडे सद्यःस्थितीत (21 सप्टेंबरपर्यंत) 336 कोटी 15 लाख 75 हजार रुपयांची एफआरपी थकीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FRP Sugar Factory Galap Permission