सावधान...फळं पिकलीत कार्बाईडने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

सांगली - कार्बाईडचा वापर करून पिकवलेल्या केळी व आंब्यांमुळे आरोग्याच्या गंभीर समस्यांना  सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. बाजारातील तेजीचा लाभ उठवण्यास व्यापाऱ्यांकडून हा मार्ग अवलंबला जातो. यावर ज्या अन्न व औषध प्रशासन विभागाने लक्ष ठेवायला हवे, त्यांच्याकडूनच कारवाईचे कागदी घोडे नाचवण्यापलीकडे काही होत नाही.  

सांगली - कार्बाईडचा वापर करून पिकवलेल्या केळी व आंब्यांमुळे आरोग्याच्या गंभीर समस्यांना  सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. बाजारातील तेजीचा लाभ उठवण्यास व्यापाऱ्यांकडून हा मार्ग अवलंबला जातो. यावर ज्या अन्न व औषध प्रशासन विभागाने लक्ष ठेवायला हवे, त्यांच्याकडूनच कारवाईचे कागदी घोडे नाचवण्यापलीकडे काही होत नाही.  

अर्धवट पिकलेली फळे पिकवण्यासाठी पूर्वी कार्बाईड पावडरचा वापर करायचे. पावडर दिसत असल्याने द्रावण केले जाऊ लागले त्यात बुडवून पिकवलेली फळे  सालीचा रंग बदलल्याने फळ पिकल्याप्रमाणे दिसे.  आतून कच्चेच असे. अलीकडे वेल्डिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅल्शियम कार्बाईड गॅसचा वापर केला जात आहे. केळी-आंबे किंवा अन्य फळे बंदिस्त खोली  ठेवली जातात. त्या खोलीत गॅसचे दोन पंप मारले  जातात. त्यानंतर खोली काही तासांसाठी घट्ट बंद केली जाते. बाहेरील वातावरणाशी संपर्क येऊ दिला जात नाही. त्यामुळे काही तासांत फळे पिकवली जातात. बाजारातील तेजी मंदीचा विचार करून व्यापारी असे मार्ग निवडतात.   

फळे पिकवण्याच्या पारंपरिक पद्धतीत पाडाला आलेली फळे नैसर्गिकरीत्या पिकत. त्यासाठी खोली पाच ते सात दिवसांपर्यंत बंद ठेवली जायची. काही वर्षांत फळ झाडांच्या लागवडीसाठी रासायनिक खतांचा वापर  वाढला. फळांच्या चाचणीत रसायनाचे अंश सर्रास आढळत आहेत. त्यामुळे देशांतर्गत व परदेशी बाजारातील विक्रीवर परिणाम झाला. काही वेळा बंदी आणली गेली. निर्यातक्षम फळांसाठी गुणवत्ता तपासणारी यंत्रणा आहे. मात्र देशांतर्गत बाजारपेठेत अशी तपासणी होत नाही. अन्न औषध प्रशासन ही एकच यंत्रणा हे काम करते. मात्र तिच्याकडे अनेक कामांचा भार असल्याने कारवाईचा केवळ फार्स होतो. व्यापारी, विक्रेत्यांना त्रास दिला जातो. 

लोकांच्या आरोग्याचा विचारच केला जात नाही. वेगवान पद्धतीने पिकवलेली फळे सर्रास बाजारात विकली जातात. आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम दिसतात. विशेषतः कर्करुग्णांचे वाढते प्रमाण अशा रसायनयुक्त शेतमालाचाच परिणाम आहे. ग्रामीण भागासाठी शास्त्रशुद्ध सर्वेक्षणाचा अभाव आहे. मात्र तो होण्याची गरज निर्माण झाली आहे.

कार्बाईड गॅसचा वापर करून पिकवलेली फळे खाल्ल्याने त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

मज्जतंतू व मेंदू बधिर होण्याची शक्‍यता असते. हाता-पायाला मुंग्या येणे, घशाला सूज व खवखव होणे, पोटाचे आजार, पचन संस्थेत बिघाड, सर्दी व दम्याचा त्रास अशी लक्षणे दिसतात. यामागे कृत्रिमरीत्या वेगवान पद्धतीने पिकवलेल्या फळांचे सेवन हेच कारण आहे.
डॉ. अशोक पुरोहित, नाक, कान, घसा तज्ज्ञ 

फळे पिकवण्यासाठी कॉर्बाईड पुड्या ठेवल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. तीन वर्षे तुरुंगवास व एक लाख दंड अशा शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. प्रशासनातर्फे व्यापाऱ्यांना मेळावे घेऊन जनजागृती केली जात आहे. वर्षभरात चार ठिकाणी छापे टाकून नमुने घेतलेत. त्यातील तीन व्यापाऱ्यांवर गुन्हेही दाखल केलेत. नागरिकांनी अशा प्रकारांविरोधात तक्रारी द्याव्यात.
शिवकुमार कोडगिरे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

Web Title: Fruits are carbide ripe