crime.jpg
crime.jpg

संतोष कदम खूनप्रकरणी फरारी कपिल पवारला अटक

इस्लामपूर (सांगली)- येथील निनाईनगर मधील संतोष रखमाजी कदम याच्या खून प्रकरणी फरार असलेला सराईत गुन्हेगार कपिल कृष्णा पवार (वय 26, रा. इस्लामपूर) याला आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास इस्लामपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. कदम खून प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेला हा सातवा संशयित आहे. यापूर्वी पोलिसांनी पवारवर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. नंतर त्याला हद्दपार देखील केले होते, तरीही तो या भागात गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय होता. त्याला आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 8 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

इस्लामपूर शहराबाहेरील रिंग रोड लागत असलेल्या खोल वाटेच्या पुढे मठकरी ओढ्याजवळ पोलिसांनी ही कारवाई करत कपिल पवारच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. अनेक दिवस पोलीस त्याचा शोध घेत होते. तडीपार असूनही त्याचा या भागात वावर असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या असल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. कपिल पवार सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रविवारी 28 जून ला रात्री साडेबाराच्या सुमारास येथील निनाईनगरात संतोष रखमाजी कदम याचा सहा जणांनी मिळून खून केला होता. अजित हणमंत पाटील, सुरज उर्फ पांड्या जाधव, प्रतिक उर्फ पिल्या पाटील यांच्यासह इतर तीन अनोळखी अशा सहा जणांच्यावर गुन्हे दाखल होते. या सर्वांनी धारदार शस्त्राने कदमच्या छातीत व पोटात सपासप वार केले होते. मृत संतोष कदम हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल होते. गुन्हेगारी वर्चस्ववादातूनच ही घटना घडल्याचे तपासात पुढे येत आहे. आतापर्यंत त्या तिघांसह संतोष भीमराव कोळेकर, सचिन उर्फ रघु बाबुराव कोळेकर, एक अल्पवयीन व पहाटे अटक करण्यात आलेल्या कपिल पवार यांचा समावेश आहे. पवारच्या अटकेच्या कारवाईत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, दीपक ठोंबरे, अरुण पाटील, अमोल चव्हाण, आलमगीर लतीफ, शरद जाधव, गणेश शेळके, प्रशांत देसाई यांच्या पथकाचा सहभाग होता.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com