निधी ५० लाखांचा; स्पर्धा कागदावरच

संदीप खांडेकर
शनिवार, 22 एप्रिल 2017

चार क्रीडा प्रकारांची स्थिती : शासन व संघटनांत ताळमेळ नसल्याचे स्पष्ट
कोल्हापूर - हजार नव्हे, दहा हजार नव्हे, तर तब्बल प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचा भरघोस निधी असणाऱ्या राज्यस्तरीय चार क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा गेल्या वर्षी झाल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चार क्रीडा प्रकारांची स्थिती : शासन व संघटनांत ताळमेळ नसल्याचे स्पष्ट
कोल्हापूर - हजार नव्हे, दहा हजार नव्हे, तर तब्बल प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचा भरघोस निधी असणाऱ्या राज्यस्तरीय चार क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा गेल्या वर्षी झाल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शासन व एकविध संघटनांत ताळमेळ नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. अथक मेहनत करून स्पर्धांकडे डोळे लावून बसलेल्या खेळाडूंचे नुकसान झाले असले, तरी याचे सोयरसुतक कोणालाच नसल्याचे दिसते आहे. यंदा या चार क्रीडा प्रकारांना शासनातर्फे निधी मंजूर झाला आहे. मात्र यंदा तरी या स्पर्धा होणार की निधी परत जाणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

खाशाबा जाधव चषक कुस्ती, भाई नेरूरकर खो-खो, छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी, छत्रपती शिवाजी चषक व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांसाठी प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचा निधी शासनातर्फे दिला जातो. खेळाडू व पंचांचा प्रवास खर्च, भोजन व निवास व्यवस्था, स्पर्धेसाठी रोख बक्षीस, मैदानाची पूर्वतयारी, मैदानावर मंडप यासाठी हा निधी खर्च करायचा असतो. 

या स्पर्धांच्या आयोजनामुळे संबंधित जिल्ह्यात त्या त्या खेळासाठी पोषक वातावरण निर्मिती होते. २०१५ला नाशिकला कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. मात्र, ती मध्येच बंद पाडण्यात आली. नागपूरला कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा काही कारणास्तव होऊ शकली नाही. औरंगाबादला व्हॉलीबॉल, तर मुंबईला खो-खो स्पर्धा घेण्यात येणार होती.

मात्र, दुष्काळाचे कारण सांगून ती रद्द करण्यात आली. २०१६ला तरी या स्पर्धा होतील, अशी आशा होती. शासनाने स्पर्धांचे ठिकाण ठरविण्यात वेळ घालवल्याने एकही स्पर्धा झाली नाही. इचलकरंजीत कबड्डी स्पर्धा होण्यासाठी मागणी करण्यात आली होती. या मागणीकडे दुर्लक्ष झाले. एकही स्पर्धा न झाल्याने स्पर्धेच्या आयोजनासाठीचा निधी परत गेला. या स्पर्धांत राज्य संघटनांकडून पाठविलेले संघ सहभागी होतात. त्यामुळे खेळाडूंनाही स्पर्धेच्या आयोजनाची प्रतीक्षा होती. वर्षभर केलेला कसून सराव संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी उपयोगी पडेल, अशा विचारात खेळाडू होते. स्पर्धा न झाल्याने त्यांच्यातून नाराजीचा सूर आजही उमटत आहे. यंदा मंजूर झालेला निधी स्पर्धेच्या आयोजनावरच खर्च होऊ दे, अशीच मागणी खेळाडूंतून होत आहे. 

क्रीडा प्रकार व स्पर्धेचे सुरू झालेले वर्ष 
 १९९७-९८    कबड्डी 
 १९९८-९९    कुस्ती 
 २०१०-११      खो-खो व व्हॉलीबॉल

२०१२ पासून कबड्डी, कुस्ती राज्यस्तरावर 
कबड्डी व कुस्ती स्पर्धा २०१२-१३ पर्यंत राष्ट्रीय स्तरावर होत होती. राज्यातील खेळाडूंना स्पर्धेतून बक्षिसे मिळून क्रीडा प्रकारांना ऊर्जितावस्था यावी, यासाठी दोन्ही क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यास सुरवात झाली.

Web Title: fund 50 lakh, competition on paper