लोकांच्या घामाला माझ्या निधीची साथ - शरद पवार

लोकांच्या घामाला माझ्या निधीची साथ - शरद पवार

मलवडी - पावसाचा थेंब न्‌ थेंब साठविल्याशिवाय माणची दुष्काळी तालुका ही ओळख बदलणार नाही. ही ओळख बदलण्याचा निर्णय माणवासीयांनी घेतला आहे. या लोकांच्या घामाला माझ्या निधीची साथ देण्याचा माझा प्रमाणिक प्रयत्न आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी केले.

नरवणे (ता. माण) येथे श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, माणचे सभापती रमेश पाटोळे, खटावचे सभापती संदीप मांडवे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, ज्येष्ठ नेते वाघोजीराव पोळ, जिल्हा परिषद सदस्या डॉ. भारती पोळ व सोनाली पोळ, पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर व तानाजी कट्टे, डॉ. संदीप पोळ, मनोज पोळ, विलास सावंत, वसंतराव जगताप, युवराज सूर्यवंशी, सुनील पोळ, रमेश शिंदे, सुरेंद्र मोरे, अशोक माने, कविता म्हेत्रे आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, ‘‘पावसाचा थेंब न्‌ थेंब अडवून जिरविण्याची गरज आहे.

यासाठी तुम्ही लोक गट-तट विसरून काम करत आहात, ही खूप समाधानाची गोष्ट आहे. माण-खटावच्या पाणलोट विकासासाठी मी सव्वाशे कोटींचा निधी दिला होता. मागील वर्षी जलसंधारणाच्या कामासाठी एक कोटी दिले होते. यंदाही राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी देणे हा या भेटीमागचा हेतू आहे.’’ 

प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘‘माण-खटावमध्ये सुरू असलेल्या कामाला शरद पवार यांच्या भेटीने दुप्पट बळ मिळाले आहे. माण-खटावमधील १२३ गावे श्रमदानात सहभागी आहेत. दुष्काळी ओळख पुसण्यासाठी प्रत्येक जण जीवापाड मेहनत घेत आहे. आईवर अंत्यसंस्कार करून श्रमदानाला येणारा काशिनाथ पुकळे आमचा खरा हिरो आहे. अभय तोडकरसारखा दिव्यांग पिंगळी खुर्द हे गाव उभं करतो. ’’

उरमोडीची चर्चा
आपल्या भाषणात प्रभाकर देशमुख यांनी उरमोडीचा उल्लेख करताना सांगितले, की या योजनेसाठी (कै.)अभयसिंहराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे मोलाचे योगदान आहे. (कै.)आर. आर. पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले होते. त्यावर उरमोडीच्या पाण्याची आवर्तने वाढवून दिल्यास येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल त्यासाठी प्रयत्न करू, असे श्री. पवार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com